Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
रंगात रंगले सांगलीकर..!

06-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

आपापसातील वैरभाव विसरुन आपुलकीचे, प्रेमाचे रंग अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांवर रंगांची उधळण करण्यात आली. शालेय विद्यार्थी, कॉलेजच्या युवकांनी धुमधडाक्यात रंगपंचमीचा आनंद लुटला. सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मंगळवारी रंगपंचमी उत्साहात पार पडली. रासायनिक रंगाचा दुष्परिणाम होत असल्याने नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला. हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांना आवर घालण्यासाठी चौकाचौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निसर्गाच्या रंगोत्सवासोबत रंगाची उधळण घेवून येणारा सण म्हणून रंगपंचमीकडे पाहिले जाते. लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, काळा आणि चंदेरी अशा रंगांमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद अनेकांनी लुटला . शहरातील सोसायट्या, कॉलेज परिसर , विश्रामबाग परिसर, नेमिनाथनगर, कापड पेठ, गणपती पेठ तसेच गावभागात तरुण-तरुणींनी एकमेकांवर रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी केली. शहरात उन्हाचा एवढा कडाका असूनही जागोजागी होणार्‍या या रंगांच्या उधळणीत कोणत्याही रंगप्रेमींना उन्हाचे भान राहिले नव्हते. काही ठिकाणी डॉल्बीच्या दणदणाटासह चेहर्‍यांवर भरगच्च रंग लावलेल्या मुलं-मुलींनी घोळक्याने रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला.

शहराच्या मुख्य बाजारपेठेसह अनेक ठिकाणी रंगांच्या विक्रीचे स्टॉल उभे होते. बच्चे कंपनीसाठी नेहमीच्या बंदूक, कार्टूनच्या आकारातील पिचकार्‍या रंगानी भरल्या होत्या. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम होत असल्याने बहुतांशी मंडळींनी नैसर्गिक रंगांचा वापर केला. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी नव्हती. त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांनी रंगाची बरसात केली. रंगात न्हाऊन निघाल्याने विद्यार्थी आणि तरुणांचे चेहरे रंगीबेरंगी दिसत होते. रंगपंचमीचा जोर वाढल्याने दुपारी बारानंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter