Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बनाळी पं.स.सदस्य रविंद्र सावंत यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला

06-Mar-2018 : जत / प्रतिनिधी

जत तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचाराला उघड उघड विरोध करून त्यांच्या चौकशीची मागणी करत असल्यामुळे बनाळी पंचायत समिती सदस्य रविंद्र तानाजी सावंत यांच्यावर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. भाजप आ.विलासराव जगताप यांच्याकडून पोलिसांवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वरिष्ट स्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जत तालुका कॉंग्रेस आयचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बिराजदार यांनी दिला आहे.

ते म्हणाले, जत तालुक्यातील बनाळी पंचायत समिती मतदार संघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने रविंद्र सावंत विजयी झाले आहेत. या मतदारसंघात आ.विलासराव जगताप यांची सत्ता होती. मात्र, त्या ठिकाणी सावंत यांनी चांगले यश मिळविले आहे. कमी वयात सरपंच, चेअरमन आदीसह पंचायत समिती सदस्यपदापर्यंत मजल मारली आहे. तसेच पंचायत समितीमध्ये गटनेते पदाची भूमिका ही आक्रमकपणे ते पार पाडत आहेत, तर मनरेगाच्या कामात झालेल्या कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराला विरोध व त्यांच्या चौकशीची वारंवार मागणी केल्याच्या कारणावरून रविंद्र सावंत यांचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने त्यांच्यावर खुनी हल्ला चढविला आहे, असा आरोपही आप्पाराया बिराजदार यांनी केला आहे. दरम्यान, हे प्रकरण दडपण्यासाठी स्थानिक भाजपचे आ. विलासराव जगताप व पंचायत समिती सभापती यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. तर संबंधित बनाळीतील भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter