Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बजाज यांच्या विरोधात १९ नगरसेवकांसह ३३ पदाधिकार्‍यांनी केली प्रदेशकडे तक्रार

06-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांचे धोरण पक्षहिताविरोधी आहे. त्यांचा एकतर्फी कारभार पक्षाला घातक आहे. त्यामुळे त्यांची फेरनिवड करू नये, अशी तक्रार १९ नगरसेवकांसह ३३ पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे मंगळवारी केली. त्यामुळे संजय बजाज एकाकी पडले असून प्रदेश राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या निवडणुका जुलैमध्ये होणार आहेत. निवडणु-कीला चार महिने बाकी असताना राष्ट्रवादीमधील गटबाजी उफाळून आली आहे. पदाधिकारी निवडीसाठी राष्ट्रवादीची शनिवारी पक्ष कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत शहर जिल्हाध्यक्षपदी संजय बजाज यांची फेरनिवड करण्यात आली होती, मात्र या निवडीला कमलाकर पाटील गटाने विरोध केला होता. पक्षाच्या बैठकीला एकाही नगरसेवकाला निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे संजय बजाज यांच्या निवडीला नगरसेवक व काही पदाधिकार्‍यांनी विरोध दर्शविला. प्रदेशच्या धोरणाप्रमाणे मतदान प्रक्रियद्वारे निवड करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे आ.जयंत पाटील व पक्षनिरिक्षकांनी बजाज यांच्या निवडीला स्थगिती देत बैठकीचा अहवाल प्रदेशकडे पाठविणार असल्याची माहिती दिली.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून संजय बजाज यांच्या निवडीला विरोध होत चालला आहे. त्यांची फेरनिवड करू नये, अशी मागणी आता नगरसेवक व प्रमुख पदाधिकार्‍यांतून होत आहे. त्या संदर्भात दोन दिवस सांगली जिमखान्यात कमलाकर पाटील समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांनी केलेल्या विविध तक्रारींचे निवेदन शनिवारी प्रदेश समितीकडे फॅक्सद्वारे पाठविण्यात आले. त्यामध्ये शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज नगरसेवकांना धमक्या देत आहेत. निवडणुकीत कोणला उमेदवारी द्यायची हे माझ्या हातात आहेत. माझ्या विरोधात कोण गेला तर त्याला निवडणुकीत पाडण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू , अशी धमकी बजाज यांनी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिवाय शहर जिल्हाध्यक्षांनी केलेल्या कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेता बजाज परस्पर निर्णय घेतात, असा आरोप देखील निवेदनात केला आहे.

या निवेदनावर महापालिकेतील राष्ट्रवादी व सहयोगी २५ नगरसेवकांपैकी १९ नगरसेवकांच्या या सह्या आहेत, तसेच राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, सांगली विधानसभा क्षेत्र युवक ग्रामीणचे अध्यक्ष सचिन जगदाळे, परवेज मुलाणी, प्रकाश व्हनखडे, दत्ता पाटील, अजिंक्य पाटील, पंकज बनसोडे, शुभम जाधव, योगेंद्र थोरात यांच्यासह १४ पदाधिकार्‍यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter