Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
खंडणीप्रकरणी बाळू भोकरे व साथीदारांनी केला तरूणावर तलवार हल्ला : एकास अटक

06-Mar-2018 : सांगली /प्रतिनिधी

पन्नास हजार रूपयांची खंडणी न दिल्याने मिलिंद प्रकाश चिनके (वय २१, रा.गणेशनगर) या तरूणावर बाळू भोकरे व त्याच्या चार साथीदारांनी तलवारीने हल्ला केला, तसेच रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बाळू भोकरेसह पाचजणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धिरज बाळासाहेब कोळेकर (वय २१) याला अटक केली आहे. बाळू भोकरे व इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

या हल्लाप्रकरणी गुंड बाळू भोकरे, धिरज आयरे, धिरज कोळेकर, अक्षय शिंदे (सर्व रा. गणेशनगर, सांगली) व एका अनोळखी व्यक्तिवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, मिलिंद चिनके याच्याकडून बाळू भोकरेने काही दिवसांपूर्वी पन्नास हजार रूपयांची खंडणी मागितली होती, मात्र चिनकेने प्रतिसाद दिला नव्हता. सोमवारी दुपारी तीन वाजता मिलिंद चिनके घरी निघाला होता. तो गणेशनगर येथील भुईराज हौसिंग सोसायटीमध्ये राहतो. त्यावेळी भोकरेच्या साथीदारांनी त्याला वाटेत गाठले. चिनके याला पकडून बाळू भोकरे याच्या कार्यालयासमोर आणण्यात आले. त्यावेळी भोकरेने चिनके याला धमकावत ‘पन्नास हजार रूपये का दिले नाहीस’, अशी विचारणा केली. यातून वादावादी झाली. यात धिरज कोळेकरने चिनकेवर तलवार हल्ला केला, तर बाळू भोकरेने कंबरेला लावलेले रिव्हॉल्वर काढून त्याच्या तोंडावर फेकून मारले. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी चिनकेला दिली.

भोकरेच्या इतर साथीदारांनी चिनकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात चिनके जखमी झाला. त्याला येथील वसंतदादा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून चिनकेच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिसात बाळू भोकरेसह पाचजणांवर खुनी हल्ला, खंडणी, धमकावणे, बेकायदा हत्यार बाळगणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी धिरज बाबासाहेब कोळेकर (वय २१) यास अटक केली आहे. अन्य चौघांच्या शोधासाठी पोलिसांनी त्यांच्या घरावर छापे टाकले, पण कुणाचाही सुगावा लागला नाही.

बाळू भोकरे व त्याच्या साथीदारांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. बाळू भोकरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी सावंत टोळीने त्याच्यावर हल्ला चढविला होता, मात्र तो या हाल्ल्यातून बचावला होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter