Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मनपा क्षेत्रातील ५५ पॅथॉलॉजी लॅब सील होणार

10-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये पात्रताधारक वैद्यकीय अधिकारी आवश्यक असताना मनपा क्षेत्रातील ५५ लॅबमध्ये पात्रधारक अधिकारी नसल्याने ह्या लॅब तातडीने सील करण्याचे आदेश आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आरोग्य विभागाला दिले. त्यामुळे सोमवारपासून ही कारवाई सुरू होण्याची शक्यता असून बेकायदेशीर लॅबधारकांचे धाबे दणाणले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमबीबीएस व एमडी वैद्यकीय पदवीप्राप्त डॉक्टर वगळता इतर पदवीधारकांना पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालविण्यास परवानगी नाही. तज्ज्ञ व्यक्ती नसल्यास लॅब सील करण्याची कारवाई सुरू आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकताच मनपा क्षेत्रात पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा सर्व्हे केला आहे. सांगली, मिरज व कुपवाड शहरात ८६ पॅथॉलॉजी लॅब आहेत. या लॅबमधील डॉक्टरांच्या पदवीची तपासणी केली आहे. त्यानुसार ३१ लॅबमध्ये एमबीबीएस व एमडी डॉक्टर असल्याचे आढळून आले. शासनाच्या नियमाप्रमाणे ह्या लॅब वैध आहेत.

तर इतर १५ पॅथॉलॉजी लॅब खासगी डॉक्टरांकडून सुरू आहेत. त्यामध्ये डीएमएलटी पदवी झालेले तज्ज्ञ आहेत. तर ४० खासगी रुग्णालयामध्ये देखील पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी देखील पात्रताधारक वैद्यकीय अधिकारी नाहीत. या पॅथॉलॉजी लॅबमध्ये विविध चाचण्या केल्या जातात. या चाचणीचे रिपोर्ट दिले जातात. वास्तविक त्यांना याबाबतचे अधिकार नाहीत. तरी देखील रिपार्ट दिले जातात. त्यामुळे महापालिकेने ह्या लॅब बेकायदेशीर ठरवल्या आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter