Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो : मुख्यमंत्री

10-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने आपण अत्यंत अजातशत्रू असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन नेहमी काम करणार्‍या व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी अनेक मान्यवरांनी शोकसभेत आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. पतंगराव कदम ज्यावेळी आजारी पडले, तेव्हा वाटले नव्हते की अशा प्रकारची घटना होईल. डॉ. कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण करून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्याचे मोठे काम केले. शिक्षण, राजकारण, सहकार अशा प्रत्येक क्षेत्रात डॉ. पतंगराव कदम यांनी आपला ठसा उमटवला. सर्व वयातल्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी त्यांच्यात होती. डॉ. पतंगराव कदम आपल्यातून निघून जाण्याची दु:खद घटना असून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मोकळ्या मनाचा, मोकळा-ढाकळा माणूस : पंकजा मुंडे

पतंगराव कदम काका म्हणजे राज्याच्या राजकारणातील मोकळा मनाचा मोकळा-ढाकळा माणूस होते. त्यांचे आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. तीच मैत्री मी व विश्‍वजीत या आमच्या पुढच्या पिढीने सुद्धा जोपासली आहे. त्यांचा परिवारातील सदस्या म्हणून मी या ठिकाणी आली आहे. मुंडे साहेबांच्या नंतर माझी लेक म्हणून ते माझा उल्लेख करीत होते. त्यांच्या जाण्याने माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter