Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शोकाकूल वातावरणात पतंगरावांचा रक्षा विसर्जन विधी

12-Mar-2018 : कडेगाव / प्रतिनिधी

राज्याचे माजी मंत्री स्व. डॉ.पतंगराव कदम यांच्या रक्षाविसर्जनाचा विधी हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीत शोकाकूल व भावपूर्ण वातावरणामध्ये सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर पार पडला. यावेळी राज्यातील सहकार, शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.

शुक्रवार दिनांक ९ मार्च रोजी डॉ.पतंगराव कदम यांचे मुंबईच्या लिलावती हॉस्पीटलमध्ये निधन झाले . शनिवारी सायंकाळी ६ वाजता वांगी (ता.कडेगाव) येथील सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर अलोट जनसागराच्या साक्षीने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला . लाखोंच्या पोशिंद्याने शनिवारी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक जाण्याने जिल्ह्यात व राज्यात शोककळा पसरली आहे . सोमवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता रक्षा विसर्जन विधी करण्यात आल्या. यावेळी अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

समाजाचे संसार चालविणारा माणूस : संभाजीराव भिडे (गुरुजी)

डॉ.पतंगराव कदम यांनी समाजाचे संसार चालविले होते. निरपेक्ष भावनेने ते सर्वांना मदत करत होते. देश, देव, धर्म व समाजाबद्दल अपार भाव मनी असणारा हा माणूस होता. त्यांच्या अंतकरणात करूणा, जिव्हाळा, आपुलकीचे भाव होते. हे राज्याचे किंवा देशाचे दुःख नसून समस्त संसाराचे हे दुःख आहे. कर्तुत्व, नेतृत्व आणि भरारी घेण्याचे वरदान त्यांना भगवंताने दिले होते. या भारतमातेचा देशभक्त, लोकभक्त व समाजभक्त हरपला असून परमेश्‍वर त्यांना सद्गती देवो. समाजाच्या हितासाठी ते पुन्हा जन्माला यावेत .

राज्याचे भरून न निघणारे नुकसान : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

डॉ.कदम आपल्यात राहिले नाहीत. यावर विश्‍वासच बसत नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्बेतीची धाकधूक होती, पण असे काही घडेल असे वाटले नव्हते. राज्याच्या व देशाच्या पातळीवर नेतृत्व सिध्द करणारे ते नेते होते. आमचा व त्यांच्या कुटुंबियाचा तीन पिढ्यांचा संबंध आहे. डॉ.कदम यांचासारखा नेता सहज घडत नसतो. त्याला अनेक वर्षाचा काळ जावा लागतो.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter