Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मनपाच्या प्रभाग रचनेवर आज निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

12-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होणार आहे. यानंतर दोन दिवसात आयोगाच्या सूचनांसह प्रभाग रचना महापालिकेकडे येणार आहे. तर दि. २० मार्चला आरक्षण सोडत होणार असून त्याची अधिसूचना शनिवारी प्रसिध्द होणार आहे.

महापालिका निवडणूक जुलैमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची समिती नेमली होती. ही प्रभाग रचना दि. ३ मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी मागासवर्गीय प्रभाग निश्‍चित करून प्रभाग रचना सादर केली होती. आयोगाने याची छाननी करून पालिकेला काही सूचना, दुरूस्त्या सूचविल्या होत्या. पालिकेच्या अधिकार्‍यांनी मुंबईत तळ ठोकून आयोगाच्या सूचनांनुसार प्रभाग रचनेत दुरुस्त्या केल्या. या दुरस्तींवर प्रभाग रचनेवर मंगळवारी निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार आहे. त्यानंतर दोन दिवसात प्रारूप प्रभाग रचना पुन्हा महापालिकेकडे सादर होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर प्रारूप प्रभाग रचना २० मार्च रोजी जनतेसाठी खुली करण्यात येणार आहे. या दिवशी महिला व इतर मागास प्रवर्गाची आरक्षण सोडत होणार आहे . दि. २० मार्चला प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर याबाबतची अधिसूचना २३ मार्चला राजपत्रात प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर २३ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीवर नागरीकांकडून हरकती व सुचना मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता इच्छुकांमध्ये आरक्षण व प्रभाग रचनेची धाकधूक वाढली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter