Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
डॉ.पतंगराव कदम यांना विधानसभेत आदरांजली

12-Mar-2018 : मुंबई / प्रतिनिधी

विधानसभेतील विद्यमान सदस्य आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले . कार्यक्रम पत्रिकेत केवळ इतकेच कामकाज दाखविण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शोक प्रस्ताव मांडतांना स्व.पतंगराव कदम हे सामाजिक बांधिलकी जपणारे निगर्वी आणि विलक्षण लोभस व्यक्तिमत्व होते अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रयोगशील शिक्षणतज्ञ असणार्‍या पतंगरावांनी गरिबांना कायम मदतच केली, वारकरी भवन बांधून त्यांनी भक्ती जपली असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. ते म्हणाले की सांगली जिल्ह्याने दोन उमदे नेते या विधानसभेच्या कार्यकाळातच गमावले. या राज्याला शाप आहे की काय , कारण विलासराव, आर.आर . आबा, गोपीनाथ मुंडे, डावखरे आणि आता पतंगराव असे जनतेशी नाळ असलेले नेते काळाच्या पडद्या आड गेले त्यामुळे खरोखरच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते पुढे म्हणाले, पतंगराव माझ्या वडीलांचे मित्र होते आणि हक्काने काही सांगण्याचा अधिकार त्यांना होता असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांना आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरून आले ते म्हणाले की, माझ्या वडिलांच्या सोबत काम केलेले पतंगराव माझे मार्गदर्शक होते, सगळ्यांशी मैत्री जपणारा माणूस गेला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. साधारण शेतकरी कुटूंबातून आलेल्या पतंगरावांची वाटचाल थक्क करणारी होती, मात्र त्यांचे जाणे मनाला चटका लावून जाणारे असल्याचे राष्ट्रवादीचे अजित पवार म्हणाले,अनेक वरिष्ठांशी अरे तुरेचे संबंध होते, त्यामुळे कधी कुणी दुखावले गेले नाही. कारण सर्वांशी आपलेपणाने वागणारे नेते अशी त्यांची ओळख होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter