Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सामाजिक काम कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पतंगराव कदम

12-Mar-2018 : सामाजिक काम कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पतंगराव कदम

पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं कधी वाटलंच नव्हतं. त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांनी जय-पराजय याचा कधीच विचार केला नाही. ते लढत राहिले. सामाजिक काम कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंतगराव कदम असे उद्गार विधानसभेतील गट नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहताना काढले.

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचा शोक प्रस्ताव सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. त्यावेळी पतंगराव कदम यांच्या जीवन पैलूंवर जयंत पाटील यांनी प्रकाशझोत टाकला.

मी असे अनेक क्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहिलेत जिथे पतंगराव कदम यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी हट्ट धरला आहे. नवे नेतृत्व जर समोर येत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याचे काम पतंगराव कदम करायचे.

त्यांचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा होता. त्यांच्या मतदारसंघातील जनतेला पाणी योग्य तर्‍हेने मिळते की नाही याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. अशा या लढवय्या नेत्याला मी माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे श्रद्धांजली वाहतो. पतंगराव कदम यांचे निधन कॅन्सरमुळे झाले आहे. या आधी आबांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यामुळे आपल्या सेवनात काय येत आहे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, तसेच सरकारने पिकांवर फवारल्या जाणार्‍या औषधांवरही मर्यादा घालावी. काही कायदा करता येतो का ते पहावे. हीच खरी या दोघांना श्रध्दांजली ठरेल असेही आ. जयंत पाटील म्हणाले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter