Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यातील २५० गावे दुष्काळी जाहीर होणार

09-Oct-2018 : सांगली/ प्रतिनिधी

यंदा जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी परतीच्या पावसाच्या आशेवर होता, मात्र त्या पावसाची शक्यताही कमीच असल्याचे दिसते. वाढत्या पाणी टंचाईने जिल्ह्यातील अडीचशे गावांवर दुष्काळाची छाया गडद होवू लागली आहे. पाण्याअभावी हातातोंडाला आलेली पिकंही करपू लागली आहेत. येत्या काही दिवसांत पिण्याचा पाण्याचा प्रश्‍नही भेडसावण्याची भीती आहे. जिल्हा प्रशासनाकडून पेरण्या आणि पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. पन्नासपेक्षा कमी आणेवारी असलेली तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यांत २४६ गावे आहेत. ३१ ऑक्टोंबरपर्यंत राज्यात दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याने त्याकडे गावांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आटपाडी, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, वाळव्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

मागील काही वषार्ंपासून जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला नव्हता. गेल्या दोन वर्षात चांगला पाऊस झाल्याने टंचाईची परिस्थिती जाणवली नाही. यंदाही हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे वेळेवर पावसाला सुरुवात झाली. पश्‍चिम भागात बर्‍यापैकी पावसाने हजेरी लावल्याने चांदोली आणि कोयना धरण भरले. काही ठिकाणी मात्र उशिरा पाऊस झाला, तर काही ठिकाणी पेरणीनंतर पावसाने उसंत घेतल्याने पिकांची वाढ खुंटली. पाण्याअभावी पिके करपून गेली आहेत. पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व भागात पावसाने पाठ फिरविली. या भागात परतीचा पाऊस चांगला होतो, बळीराजाही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, आज पडेल, उद्या पडेल, या आशेवर आहे, मात्र पावसाची दडी सुरुच असल्याचे चित्र आहे.

पूर्व भागाला दुष्काळाचा फटका बसला आहे. मात्र पाण्याची टंचाई फारशी जाणवली नाही . गेल्या उन्हाळ्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजनांतून तलाव भरून घेण्यात आले होते. ओढे, नाले यांना पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाणीपातळी काही प्रमाणात वाढली होती. मागील काही वर्षांत बोअर मशीन आल्या. कूपनलिकांमुळे जमिनीची चाळण झाली, तर भूगर्भातून बेसुमार पाणी उपसा झाला, ऑक्टोंबरच्या सुरुवातीलाच कुपनलिकांतील पाणी कमी झाल्याचे चित्र आहे. वर्षभरात सिंचन योजना सातत्याने सुरु राहिल्या. पाणी मिळणार असल्याचा अंदाज बांधत शेतकर्‍यांनी बागायती क्षेत्र वाढविले. पूर्व भागात द्राक्ष, डाळिंबासह उसाचे क्षेत्र वाढत आहे. पूर्व भागात यंदा पावसाची बिकट स्थिती आहे. परतीचा पाऊसही अद्याप पुरेसा झालेला नाही. यंदा पाऊस पडणार की नाही, याची चिंता शेतकर्‍यांना लागलेली आहे. बहुसंख्य तलावही कोरडे आहेत. आता पावसाचा कालावधी कमी राहिला आहे. यापुढेही पाऊस न झाल्यास दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter