Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘केन ऍग्रो’ ऊसबिलाची रक्कम दोन दिवसात जमा करणार

11-Oct-2018 : चिंचणी /वार्ताहर

केन ऍग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखाना सन २०१७-१८ च्या गळीत हंगामातील ऊस बिलाची एफ.आर.पी प्रमाणे होणारी रक्कम प्रतिटन २ हजार ५२५ रुपयांप्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन दिवसांत जमा करणार असल्याची माहिती केन ऍग्रोचे चेअरमन पृथ्वीराज देशमुख यांनी कडेपूर ( ता. कडेगाव ) येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, आर्थिक अडचणींमुळे ऊस बील शेतकर्‍यांना वेळेत देता आले नाही. ही वस्तुस्थिती आहे, परंतु येत्या दोन दिवसांत ऊसबील शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करीत आहोत. कारखान्याच्या साखरेबाबत चुकीची विधाने करून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही मंडळीनी सुरू केला आहे. त्यामुळे बँकांनी तारण ठेवलेल्या कारखाना कार्यस्थळावरील साखर गोदामांची तपासणी करून खातर जमा करून घेतली आहे. लोकांची दिशाभूल करून कारखान्या समोर अडचणी निर्माण करणे, शेतकर्‍यांमध्ये गैरसमज पसरविण्याचा जो उद्योग केला जात आहे , तो अत्यंत चुकीचा आहे.

ते म्हणाले, वास्तविक केन ऍग्रो साखर कारखान्याकडे साखर उत्पादनाबरोबर डिस्टीलरी व को-जनरेशन नसताना कारखान्याने सन २००९-१० ते २०१७-१८ या ९ वर्षांत ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना एफ. आर. पी. पेक्षा जादा रक्कम १९२ कोटी रूपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा केलेले आहे. वास्तविक आमच्याकडे उपपदार्थ निर्मिती नसतानाही इतर उपपदार्थ निर्मिती क्षमता असणार्‍या कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याचा केन ऍग्रो कारखान्याने सातत्याने प्रयत्न केला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये २५ हजार मे.टन ऊसाचे उत्पादन होत होते. केन ऍग्रोने टेंभू , ताकारी उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या बांधापर्यत पाणी जाण्यासाठी स्वखर्चाने प्रयत्न करून आज रोजी कारखान्याच्या स्वतःच्या सभासदांचा अंदाजे ८ लाख मे.टन ऊस उभा केलेला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter