Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यातील ७ तालुके दुष्काळसदृश

13-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

राज्यात बहुतांशी जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा सरकारकडून घेतला जात आहे. मात्र पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सात तालुके दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. मिरज पूर्वभागाला टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत, मात्र तालुक्यात १०१ टक्के झालेल्या पावसाच्या सरासरीने मिरज तालुक्याला वगळण्यात आल्याचे दिसून येते. तर चांगला पाऊस झालेल्या पलूस आणि कडेगाव तालुक्याचा दुष्काळसदृशमध्ये समावेश करण्यात आला.

यंदा जिल्ह्यातील बहुतांशी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईने जिल्ह्यातील बहुतांशी गावांवर दुष्काळाची छाया गडद होऊ लागली आहे. पाण्याअभावी हातातोंडाला आलेली पीकही करपू लागली आहेत. येत्या काही दिवसांत पिण्याचा पाण्याचा प्रश्‍नही भेडसावण्याची भीती आहे. जिल्हा प्रशासनाने पेरण्या आणि पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल तयार केला. त्यात पन्नासपेक्षा कमी आणेवारी असलेल्या तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यांतील २४६ गावांचा समावेश आहे. तो अहवाल शासनाला पाठविला आहे. पूर्वभागातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व या भागात पावसाने पाठ फिरवली. या भागात परतीचा पाऊस चांगला होतो, बळिराजाही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, आज पडेल, उद्या पडेल, या आशेवर आहे, मात्र पावसाची दडी कायम राहिली.

दुष्काळी स्थिती वाढू लागली असल्याने शासनाकडून गांभीर्याने घेतले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter