Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
प्रकाश शेंडगेंच्या मेळाव्याचा फज्जा

16-Oct-2018 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याचा पूर्णपणे फज्जा उडाला. केवळ काही हजारांतच कार्यकर्ते प्रकाश शेंडगे यांच्या मेळाव्यास उपस्थित होते, तर गोपीचंद पडळकर यांच्या धनगर समाजाच्या दसरा मेळाव्यास धनगर बांधवांची उपस्थिती लाखोंनी होती, समाजाचे नेतृत्व शेंडगे घराण्याकडून काढून घेवून ते आता धनगर समाजाने गोपीचंद पडळकर यांच्याकडे दिल्याचे या दोन मेळाव्यांवरून स्पष्ट झाल्याची चर्चा आरेवाडी येथे केली जात होती.

माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, खा. विकास महात्मे आदि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या व्यासपिठावर होते, तथापि समाजाचे हे दिग्गजही समाजाला आपल्याकडे खेचू शकले नाहीत.

गेली कित्येक दशके धनगर समाजाचे नेतृत्व शिवाजीराव शेंडगे यांच्यापासून शेंडगे घराण्याकडे होते, धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे ही मागणी शिवाजीराव शेंडगे मंत्री होते तेव्हापासूनची आहे. तथापि समाजाच्या नेत्यांनी या मागणीकडे फारसे गांभिर्याने घेतले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे आमदार असतानाही शेंडगे घराण्यातील प्रस्थापितांनी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानेच याचा फटका मंगळवारच्या दसरा मेळाव्यात आ. प्रकाश शेंडगे यांना बसला.

दरम्यान धनगर समाजाचा आरक्षणाचा हक्क डावलणार्‍या राज्य सरकारमधील मंत्र्यांना राज्यातून फिरू देणार नाही. अशी घोषणा माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केली. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर समाजाच्या आंदोलनात सर्व शक्तीनिशी उतरू असा इशारा भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला. आरेवाडीच्या बनात झालेल्या दसरा मेळाव्यात डांगे, शेंडगे, महात्मे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter