Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सरकारला उखडून टाका - - हार्दिक पटेल

16-Oct-2018 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

‘यळकोट यळकोट.. जय मल्हार’ या घोषणेने सुरुवात करत धनगर समाजामध्ये प्रचंड आकर्षण असलेला पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलने आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. सत्ता मिळविण्यासाठी धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगून फसवणूक करणार्‍या भाजपला घरी बसवा, असे आवाहन करत त्याने ‘मी इथे आलोय तर तुमचा आवाज दिल्लीत पोहोचलाच असेल’, अशी मल्लीनाथी केली. हार्दिक पटेलच्या भाषणाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आरेवाडीतील धनगर मेळाव्याचे संयोजक गोपीचंद पडळकर यांनी जर भाजपने आरक्षण दिले नाही तर भाजपचा एकही आमदार, खासदार निवडून येता कामा नये. भाजपला मते देवू नये यासाठी सर्वांना बिरोबाची शपथ दिली.

धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे, तो न दिल्यास धनगरांनो, भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाड़ा, असे आवाहन गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केले. गोपीचंद पडळकर यांच्या दसरा मेळावा कार्यक्रमात आरेवाडी येथे ते बोलत होते.

यावेळी बोलताना पटेल म्हणाले की, धनगर समाजाच्या मेळाव्यातील ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ चा आवाज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानात गेला पाहिजे. मी गोपीचंद पडळकरना सांगितले, भाजपचे लोक धोकादायक आहेत. भरोसा ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. धनगर समाजाची लढाई न्यायाची, अस्तित्वाची आहे . सत्तेसाठी या भाजपच्या लोकांनी अनेकांच्या हत्या केल्या. कट कारस्थाने केली. मला देशद्रोही ठरवलं. आम्ही जागरूक नसल्याने ही असली गाढ़व निवडून देतो म्हणूनच या लोकांच फावतं. गोपीचंदसारखा तरुण तुमच्यासाठी लढतोय त्याच्या पाठीमागे उभे राहा. शिवरायांच्या महाराष्ट्रातील तुम्ही अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहात. मी आल्यामुळे तुमचा आवाज आता मुंबई नाही तर दिल्लीत मोदी व फडणवीस यांच्यापर्यंत गेला. ही लढाई केवळ आरक्षणासाठी नसून रोजगार, शिक्षण व स्वाभिमानासाठी आहे. आजच्या मेळाव्याची उपस्थिती पाहिली तर सरकारला दखल घेणे भाग आहे. हाच मेळावा जर मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाला असता तर सरकारने लगेच आरक्षण दिले असते. सत्ता मिळविण्यासाठी खोटे बोलून लोकांना फसविण्याचा उद्योग भाजपने आतापर्यंत केला आहे, पण आता हे सरकार आपल्याला उखडून टाकायचे आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पिवळा ध्वज फड़कवून सुरवात करण्यात आली. मान्यवरांनी व्यासपीठावर न बसता स्टेजच्या खाली बसून सरकारचा निषेध केला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या समाजाच्या लोकांनी गजीनृत्य करत ठेका धरला. मल्हार - मल्हार या आरक्षणाच्या गाण्याने उपस्थित लोकांनी उभे राहून नाचत मनसोक्त आनंद लूटला. स्टेजवर सर्व बहुजन समाजातील मंडळी व त्यांचे फ़ोटो लावण्यात आले होते.

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, यापुढे धनगर समाज भाजपसोबत जाणार नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter