Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महापौरांसह भाजप नगरसेवकांना दोन तास कोंडले
News Image

19-Oct-2018 : सांगली . प्रतिनिधी

मनपा क्षेत्रात पाणीपुरवठा व आरोग्याची समस्या गंभीर असताना महापौरांनी अर्ध्या तासात महासभा गुंडाळून पळ काढल्याने संतप्त कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महासभेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून महापौरांसह पदाधिकारी, अधिकारी व सत्ताधारी नगरसेवकांना दोन तास कोंडून घातले. आघाडीने प्रवेशद्वारासमोर तर भाजपने कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी व शंखध्वनी केला. सत्ताधारी नगरसेवक बाहेर पडत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला धक्काबुक्की करण्यात केली. यामुळे महापालिकेत शुक्रवारी तणाव निर्माण झाला होता.

महापालिकेची महासभा शुक्रवारी महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांना महासभेत बसण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी डायसमोर बसून आंदोलन केले. या गोंधळात महापौर संगीता खोत व गटनेते युवराज बावडेकर यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा गुंडाळली. यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महासभेतच पळाले पळाले, महापौर पळाले. सत्ताधारी भाजपचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जावून आंदोलन केले. आत येणार्‍या व बाहेर जाणारे सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक व अधिकार्‍यांना मज्जाव केला. अनेक नगरसेवक मनपाच्या दुसर्‍या प्रवेशद्वाराजवळून जात होते. मात्र नगरसेविका वहिदा नायकवडी, वर्षा निंबाळकर, शुभांगी साळुंखे व मनोज सरगर यांनी दुसर्‍या दरवाज्याला कुलूप ठोकून महापौरांसह नगरसेवकांना कोंडून घातले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter