Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जतमध्ये विवाहितेची तीन मुलांसह आत्महत्या

19-Oct-2018 : जत / प्रतिनिधी

पतीला असलेले दारुचे व्यसन व त्यातून होणारी भंाडणे व मुलांची काळजी यामुळे आलेल्या नैराश्येतून जतमधील विवाहिता राधा सुभाष कोळी (वय ३२) हिने आपल्या चार महिन्यांच्या चिमुरड्यासह तीन मुलांना घेवून विहिरीत उडी मारुन आपले जीवन संपविले. मुलगा प्रज्वल (वय ५), मुलगी आराध्या (वय ३) व चार महिन्यांचा यश अशी मृत मुलांची नावे आहेत. दरम्यान पोलिसांनी पती सुभाष कोळीवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, तर विहिरीच्या जाळी मारण्याच्या मुद्यावरुन जत नगरपालिका सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. विहिर अत्यंत अवघड व पायर्‍या नसलेली असल्यामुळे मृतदेह काढताना तारेवरची कसरत करावी लागली.

याबाबत माहेरच्या लोकांना घटनेची माहिती कळताच ते जत ग्रामीण रूग्णालयात दाखल झाले. चारही मृतदेह पाहून सर्वांनी एकच हंबरडा फोडला तर पती सुभाष कोळी, सासरा शेखर कोळी व सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवरून पोलिसांना नातेवाईकांनी पंचनामा व शवविच्छेदन करू दिले नाही. दिवसभर हा गोंधळ सुरूच होता. शेवटी गुन्हा दाखल करण्याच्या आश्‍वासनानंतर पंचनामा करण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , सुभाष व राधा यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला आहे. सुभाष हा शहरातच सेंट्रीगचा व्यवसाय करतो. त्यांना प्रज्वल, आराध्या व यश असे तीन मुुले आहेत. सुभाषला दारू पिण्याची सवय आहे. याच कारणावरून वडील शेखर कोळी व घरच्यांमध्ये सारखा वाद व्हायचा. हा वाद सोडविण्यासाठी बाहेरच्या लोकांनीही सुभाषला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला , परंतू , त्याच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. रोजच्या भांडणांमुळे राधाची मानसिकता खचली होती.

गुरूवारी रात्री १० वाजतादेखील घरात भांडण झाले होते. यातून ती रागाच्या भरात प्रज्वल, आराध्या व यश यांना सोबत घेऊन घराबाहेर निघून गेली. घरच्यांनीदेखील शेजार्‍याच्या घरात बसली असेल, म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत राधा घरी परतलीच नाही. रात्री ३ वाजेपर्यंत घरच्यांसह शेजारच्या लोकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही.

सकाळी सात वाजता नगरसेवक नामदेव काळे हे यल्लमा देवस्थान रोडवर फिरायला गेले होते. यावेळी यल्लम्मा विहिरीमध्ये पाणी किती आहे. याची खात्री करण्यासाठी तेथे गेले असता, चार महिन्यांच्या यशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. यानंतर काळे यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter