Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शेतकर्‍यांची पै अन् पै कारखान्यांकडून वसूल करु... एफआरपी + २०० साठी मुख्यमंत्री सकारात्मक
News Image

24-Oct-2018 : वारणानगर / सिध्दार्थ कांबळे

शेतकर्‍यांच्या नावावर डबल ढोलकी वाजविणार्‍यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, ज्यांनी दुष्काळ शब्द गायब करुन टंचाई हा शब्द आणला तेच आज दुष्काळाबाबत मागणी करत आहेत. वेड पांघरुण पेडगावाला जाण्याचा धंदा जनतेला माहित आहे , मात्र सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी या दुष्काळ परिस्थितीत खंबीरपणे उभे आहे. उत्तरप्रदेश, कर्नाटकमध्ये हजारो कोटी रुपयांचा एफआरपी प्रलंबित असताना महाराष्ट्रात मात्र २१ हजार कोटी रुपये एफआरपी देण्यात आली आहे. उर्वरित एफआरपीची पै अन् पै कारखानदारांकडून वसूल करुन शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करु, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोडोली येथे झालेल्या ऊस कामगार परिषदेत बेालताना दिला. ना.सदाभाऊ खोत यांनी केलेल्या एफआरपी + २०० रुपयांच्या ऊस दराबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या परिषदेच्या निमित्ताने ना.सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी रणशिंग फुंकले.

वारणा कोडोली येथे मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या दुसर्‍या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख,आ. अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, शिवाजीराव नाईक, सुजीत मिणचेकर ,माजी आमदार भगवानराव साळुंखे ,दिनकर पाटील, नानासाहेब महाडिक, हिंदुराव शेळके,जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, मकरंद देशपांडे ,विकम पाटील,राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राज्यातील शेतकर्‍यांना एफआरपीसाठी चार वर्षांत आंदोलन करावे लागले नाही . एकवीस हजार कोटी रुपयांची एफआरपी महाराष्ट्र राज्याने दिली आहे. उर्वरित १२० कोटी शेतकर्‍यांना कारखानदारांकडून वसूल करून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेतकरी आणि शेतमजूर यांच्या भविष्यासाठी गरज पडल्यास आम्ही राज्य शासनाची तिजोरी रिकामी करू. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय देणारे आम्हीचं असल्याने शेतकरी व कष्टकरी आमच्या पाठीशी उभे राहतील.

ते म्हणाले, शेतकर्‍यांचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी सदाभाऊंनी पुढाकार घेतला. सदाभाऊ खोत हे शेतकरी आणि सरकारमध्ये सेतूचे काम करीत आहेत. ही पहिली परिषद आहे, जिथे सरकारचे प्रतिनिधी तुमचेच आहेत. आमचे सरकार प्रतिसाद देणारे आहे. राज्यातील खूप मोठा भाग आहे जिथे दुष्काळ जाहीर केला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बँक, वीज बिल, शैक्षणिक फी, स्थगितीचे विषय आहेत ते तातडीने निकाली काढणार आहोत. शेतकर्‍यांना वेगवेगळ्या आपत्तींमध्ये १५ वर्षात यापुर्वीच्या सरकारने सात हजार कोटी दिले आणि आम्ही केवळ चार वर्षातच २२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मागच्या सरकारला १५ वर्षात जे जमले नाही ते आम्ही केले. मागील सरकारच्या काळात सरकारने साडे चारशे कोटीची खरेदी केली. आम्ही साडे आठ हजार कोटी रुपयाची खरेदी केली. सेस रद्द करून शेतकर्‍यांचे साडे तीन हजार कोटी रुपये वाचविले. साखरेचा २९ रुपये हमी भाव वाढविण्यासाठी शिफारस करणार आहोत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter