Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीला मंत्रिमंडळात स्थान नक्की : फडणवीसांची ग्वाही

24-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

ताकारी-म्हैसाळ-टेंभू योजना कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करु अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सांगलीला नक्की स्थान मिळेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. विरोधकांनी दुष्काळ शब्द बदलून दुष्काळसदृश्य असा सुरु केला होता पण आपण अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे शब्दच्छल करुन कुणी दुष्काळाचे राजकारण करु नये, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याच्या विविध भागात शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्यात भूजल पातळी वाढली होती, मात्र २७ टक्के जादा उपसा झाल्याने पाण्याची पातळी घटली. टंचाईची सर्व माहिती घेवून सरकारने राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करुन उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. विरोधकांकडून दुष्काळसदृश नको, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत राजकारण करण्याचा डाव आहे. तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने दुष्काळ हा शब्द उडवून टंचाईसदृश केला होता. त्यामुळे विरोधकांना दुष्काळाबाबत किती चिंता होती, ते जनतेला समजले आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करुन पुन्हा दुष्काळसदृश हा शब्द वापरला. राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी केंद्राच्या मदतीनंतर आणखी मदत देण्यात येणार आहे. मात्र काही जण शब्दच्छल करुन दुष्काळाचे राजकारण करीत असल्याचा टोला माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार यांना लगावला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter