Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
हेलिकॉप्टर भरकटले : पृथ्वीराज देशमुख बनले ‘पायलट’

24-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

हेलिकॉप्टर व मुख्यमंत्र्यांचे नाते चांगले नसताना सांगलीहून कोडोलीला जाताना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. कोडोलीला जाण्याऐवजी कोल्हापूरच्या दिशेने ते गेले, मात्र त्यांच्यासोबत असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी कोल्हापूरच्या पॉईंटवरुन राष्ट्रीय महामार्ग पकडून त्यानुसार कोडोलीच्या दिशेने प्रयाण केले. वारणेचा परिसर देशमुखांच्या परिचयाचा असल्यामुळे त्यांनी पायलटलाच मार्ग दाखवत ते हेलिपॅडपर्यंत आणले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दिशा बुधवारी पुन्हा एकदा चुकली. सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी आज त्यांनी सलग चार तास मॅरेथान बैठक घेतली. त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास सांगलीतील कवलापूरच्या मैदानातून ते कोडोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी निघाले होते. त्या दरम्यान हेलिकॉप्टर भरकटले.

या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter