Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
स्वाईन फ्लू , डेंग्यूचे थैमान : सत्ताधारी मात्र सत्कारात व्यस्त

29-Oct-2018 : - मंगेश चव्हाण

सांगली / प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लू, डेंग्यू या साथीच्या रोगांनी थैमान घातले असून नागरिकांचे बळी जात असताना सत्ताधारी भाजप पदाधिकारी मात्र सत्कार कार्यक्रमात व्यस्त आहेत, अशी टीका सांगली जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.

ते पुढे म्हणाले , महापा-लिकेतील सत्ताधारी भाजपची मंडळी केवळ मोठेपणा मिरविण्यात व्यस्त आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील लोक विविध आजाराने ग्रस्त झाले आहेत. तिन्ही शहरात ४३५ डेंग्यूचे रुग्ण होते. त्यापैकी दोन दगावले आहेत. स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण असून त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील जनता मरण यातना भोगत असताना सत्ताधारी सत्तेचा पूर्ण उपभोग घेत आहेत. त्यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा स्वत:चे सत्कार महत्वाचे झाले आहेत. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा करून उपाययोजना करण्यापेक्षा त्यांनी सभा गुंडाळून सत्कार समारंभाला हजेरी लावण्यास प्राधान्य दिले आहे .

लोकांप्रती सत्ताधार्‍यांना आस्था नाही. महापालिकेच्या इतिहासात कधीही यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी इतका निष्ठूरपणा दाखविला नाही. साथीचे आजार पसरले तर त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी बैठका घेणे , संबंधित अधिकार्‍यांना सर्व्हे करण्याचे आदेश देणे, अशा गोष्टी यापूर्वी होत होत्या. लोकांप्रती आस्थेची ही परंपरा मोडीत काढून नव्या सत्ताधार्‍यांनी केवळ ही पदे मिरविण्यात धन्यता माननेे सुरू केले आहे. अनुभव नसल्याचे कारण काही पदाधिकारी पुढे करीत आहेत, पण एकही पदाधिकारी नवखा नाही. दोन ते चार वेळा निवडून आलेल्या लोकांना बहुतांश पदे मिळाली आहेत. जुन्या प्रभागांना जोडण्यात आलेले नवे भाग आता महा-पालिकेच्या सर्व सोयींपासून वंचित आहेत. मुकादम, कामगारांची नियुक्तीच नव्या भागात केलेली नाही. त्यामुळे नगरसेवक, नागरिक तक्रार करूनही त्याची दखल सत्ताधार्‍यांनी घेतली नाही. एकाही प्रभागातील मुकादम, कामगार किंवा अन्य यंत्रणेचे नियोजन नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter