Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
संजयकाकांचा भाजपवर भरोसा नाय काय?

29-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

भाजपचे खासदार तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटील यांचे मागील काही दिवसांपासून स्वकीयांसोबत पटत नसल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षातील नेत्यांना बगल देवून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणअण्णा लाड आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. सदाशिव पाटील या दोन पक्षाबाहेरील नेत्यांशी त्यांनी जवळीक वाढविली आहे . मिरज, जतमध्येही पक्षातील आ. संजयकाका गटाविरोधात असल्याचे दिसते. आगामी निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांवर विसंबून न राहता अन्य पक्षातील नेत्यांशी सोयरीक जमविणे सुरु आहे, त्यामुळे संजयकाकांचा भाजपवर भरोसा नाय काय...? अशी चर्चाही सुरु असल्याचे समजते.

जिल्ह्यात भाजपला एक खासदार आणि चार आमदार निवडून दिले आहेत. या शिवाय जिल्हा परिषद, सात पंचायत समित्या, बाजार समितीमध्ये भाजपची सत्ता आली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकामागून एक स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था काबीज केल्या आहेत. जिल्ह्यात भाजपची वाढलेली ताकद नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांत सांगलीला मंत्रिपदाने हुलकावणी दिली, मात्र पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची छबी सुधारण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. मागील दीड वर्षापासून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. खा. पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यातील वाद तर सर्वश्रुत आहे. दोन्ही गटांकडून संधी मिळेल तिथं एकमेकांवर कुरघोड्या केल्या जातात. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही खासदारांवर जोरदार टीका केली होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अंतर्गत वाद बाजूला सारुन खा. पाटील यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संधी दिली. संजयकाकांना भाजपकडून संधी देण्यात आली असली तरी त्यांचे स्वकीयांबरोबरील संवादात विसंगती असल्याचे दिसून येत आहे.

भाजप नेत्यांतील वादांमुळे पक्षातील नेते आगामी लोकसभा निवडणुकीत मदत करणार का? असा प्रश्‍न खा. पाटील यांना भेडसावतोय. त्याच कार-णांमुळे पक्षातील नेत्यांना बगल देत खासदारांनी अन्य पक्षांतील नेत्यांशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास त्यांनी उपस्थिती दर्शविली. लाड हे राष्ट्रवादीचे प्रदेश नेते आहेत, त्यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलावण्याची गरज होती , मात्र स्वपक्षातील नेत्यांपेक्षा खा. संजयकाका पाटील यांना निमंत्रण दिले. तसे संजयकाकांनी कारखान्यातील काही प्रश्‍नांसाठी लाड यांना मदत केलीच आहे, हे विसरुन चालणार नाही. नोव्हेंबर महिन्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ते मोठा कार्यक्रम घेणार आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर जी.डी. बापू लाड यांचा पुरोगामी विचारांचा वारसा बाजुला ठेवून अरुणअण्णा लाड यांची भाजपशी वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे.

दुसरीकडे खानापूर-आटपाडीचे माजी आ. सदाशिव पाटील यांच्याशीही खा. पाटील यांची जवळीकता वाढली आहे. सदाशिव पाटील हे प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, ते पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्यांनी अनेकवेळा ती नाराजी बोलूनही दाखविली आहे. त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विटा शहरात आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना खासदारांनी हजेरी लावली. पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांना सोडून संजयकाकांनी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत मैत्री घट्ट करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे.

जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप आहेत, मात्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीपासून कॉंग्रेस नेते विक्रम सावंत यांच्याशी मैत्रीचे नवे पर्व सुरु झाले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter