Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत आमराईतील वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी ‘आमराई क्लब’वर कारवाई होणारच : महापौर

29-Jan-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापालिकेची परवानगी नसताना आमराई क्लबने आमराईतील वृक्षांची जेसीबी, कटरच्या सहाय्याने वृक्षतोड केल्याचा आरोप सर्वपक्षिय कार्यकर्त्यांमधून केला जात असून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान संबंधितांवर कारवाई होणारच अशी ग्वाही महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका कायद्यानुसार चालते. कायद्याचे पालन न करता आमराई क्लबने वृक्षांची कत्तल केली असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे. असेही महापौर खोत म्हणाल्या. दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर खोत यांनी उपायुक्तांना दिले. त्यांनी व स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी मंगळवारी आमराई येथील तोडलेले वृक्ष व जागेची पाहणी केली.

आमराईतील वृक्षांची रविवारी कत्तल करण्यात आली आहे. येथील आमराई ऑफिसर्स क्लबमधील टेनिस कोर्टच्या सोयीसाठी हा प्रकार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. आमराई क्लबने महापालिका प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, मात्र प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नव्हती. या क्लबचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक या क्लबचे पदाधिकारी आहेत. वृक्षतोडप्रकरणी नगरसेवक योगेंद्र थोरात, प्रकाश मुळके, कॉंग्रेसचे अमर निंबाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सागर घोडके, विशाल हिप्परकर, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, शिवसेनेचे मयूर घोडके यांच्यासह पदाधिकार्‍यांनी महापौर संगीता खोत यांची भेट घेऊन पंचनामा करण्याची मागणी केली.

त्यानुसार महापौर संगीता खोत यांनी मंगळवारी वृक्षतोड केलेल्या जागेची पाहणी केली. त्यांच्यासमवेत स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, नगरसेवक योगेंद्र थोरात, नगरसेविका भारती दिगडे, अनारकली कुरणे, उद्यान अधीक्षक शिवप्रसाद कोरे आदी होते. महापौरांनी मनपा अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. झालेला प्रकार चुकीचा आहे, महापालिका कायद्याने चालते, कायद्याचे का पालन केले नाही? अधिकार्‍यांनी कोणाला पाठीशी घातले असेल तर अधिकार्‍यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.८ पान ५ वर..

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter