Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
आ.विलासराव जगताप - तम्मनगौडा पाटील समर्थकांमधील वाद विकोपाला

29-Jan-2019 : जत / प्रतिनिधी

आ. विलासराव जगताप यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक तम्मनगौडा रवि पाटील हे आ. जगताप यांचे कट्टर विरोधक बनल्याने जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षामध्ये कलह पेटला आहे. त्यामुळे या तालुक्यातील राजकारणाने विचित्र वळण घेतले आहे. आ. जगताप व जि.प. सभापती रवि पाटील यांच्या समर्थकांमधील वाद विकोपाला गेला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच जत तालुक्यात भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या संघर्षामुळे भाजपचे जिल्हा नेते हवालदील झाले आहेत. जत विधानसभा मतदारसंघात भाजपची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे नेते मात्र भाजप अंतर्गत सुरू असलेल्या भांडणामुळे खूष आहेत. ज्या तुबची - बबलेश्‍वर योजनेच्या श्रेयवादावरून भाजप नेते भांडत आहेत, त्या योजनेची मुहूर्तमेढ आम्हीच रोवली असल्याचा दावा कॉंग्रेस नेते करत आहेत.

आगामी निवडणुकांच्या तोडांवर विविध पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, जत तालुक्यात भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात आमदार विलासराव जगताप व जिल्हा परिषद सभापदी तम्मनगौडा रवी-पाटील यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. एकेकाळी जाडरबोबलाद गटाचे रवी-पाटील घराणे आमदारांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्याला ज्ञात होत, तेच आता आमदारांचे कट्टर विरोधक बनल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पूर्व भागातील ४२ गावांच्या पाण्यासाठी तम्मनगौडा रवी-पाटील यांनी आमदारांना डावलून वरिष्ठ पातळीवर लावलेला जोर, या निमित्ताने लोकांमध्ये व पक्षश्रेष्ठीकडून मिळालेल्या सहानुभूतीच्या जोरावर त्यांनी भाजपकडे विधानसभेच्या दावेदारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर आमदार विलासराव जगताप यांनी आमदारकीसाठी पुन्हा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असणार्‍या भाजपमधील दुसर्‍या फळीतील नेत्यांची दांडी उडाली. मात्र, तम्मनगौडा रवी-पाटील यांनी आमदारांवर नाराजी व्यक्त करत, स्वतःचा गट निर्माण करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून या कारणांमुळे आमदार व सभापती गटात सध्या टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. वारंवार दोन्ही गटात तुबची - बबलेश्‍वर पाणी योजनेवरून खटके उडायला सुरूवात झाली आहे.

सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी नुकतीच सांगली येथे पत्रकार बैठक घेऊन आ. विलासराव जगताप हे पक्षविरोधी काम करतात. पक्षाची कोणतीही धोरणे ते राबवित नाहीत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter