Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विट्यात एटीएम कार्डची चोरी करुन महिलेस ३३ हजारांचा गंडा

29-Jan-2019 : विटा / प्रतिनिधी

विटा-सांगली एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स लांबविली. या पर्समधील एटीएमवरील पासवर्ड घेवून ३० हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच पर्समधील रोख रक्कम, पेनड्राईव्ह पैंजण असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत मंगळवारी विटा पोलिसांत सुमन डांगे (रा.नेवरी मुळ रा.कुपवाड) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमन डांगे या नेवरी येथे नोकरीस आहेत. शनिवारी दुपारी त्या कुपवाड येथील घरी निघाल्या होत्या. यावेळी विटा बसस्थानकात विटा - सांगली एस.टी.त चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत डांगे यांची पर्स लांबविली. या पर्समध्ये डांगे यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम कार्ड होते. तसेच पर्समधील रोख २ हजार रुपये, पैजन व पेनड्राईव्ह लंपास केला. चोरट्याने या पर्समधील एटीएम कार्डवरील पासवर्डवरून विटा येथील पलूस बँंकेच्या एटीएममधून ३० हजार रुपये काढले . त्याबाबतचा मेसेज डांगे यांना आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विटा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिेेली आहे. बँकेच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजवरुन लवकरच या चोरीचा पर्दाफाश करु असा विश्‍वास पोलिस निरीक्षक रविंद्र पिसाळ यांनी व्यक्त केला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter