Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पोलिसाकडून विवाहितेचा विनयभंग : गुन्हा दाखल

29-Jan-2019 : सांगली / प्रतिनिधी

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस दलातीलच एकाने विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. सातत्याने वरिष्ठांसह सहकार्‍यांविरोधात तक्रारी करणारा कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील नवनाथ गोपाळ खटके (वय ३०, रा. वानलेसवाडी) याच्याविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पिडित महिलेने तक्रार देताच पहाटे पाच वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत खटके याला ताब्यात घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

नवनाथ खटके हा सध्या कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात सेवेत आहे. विजयनगर येथील वानलेसवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये तो राहतो. सोमवारी रात्री तो वरच्या मजल्यावर राहणार्‍या विवाहितेच्या घरी गेला. त्यावेळी त्याने विवाहितेशी लगट करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिडित महिलेने या प्रकाराबाबत पतीस कल्पना दिली. या दांपत्याने तातडीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची पोलिसांनी दखल घेवून गुन्हा दाखल केला.

खटकेची वादग्रस्त कारकीर्द...

कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील नवनाथ गोपाळ खटके हा नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. कारकीर्दीत त्याच्याविरूध्द गैरवर्तणूक, गैरप्रकार, शिस्तभंगासारख्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. पण त्याने आपले कारनामे सुरूच ठेवले आहेत.

वरिष्ठ अधिकार्‍यांविरूध्द तक्रार करणे, धमक्या देणे असे प्रकार त्याने केले आहेत. त्यामुळे त्याची कारकीर्द वादगस्त ठरली आहे. त्याचे उपद्व्याप लक्षात घेत वरिष्ठांनी त्याला साईड ट्रॅक करत अन्य कामांची जबाबदारी सोपवली आहे. मंगळवारी त्याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter