Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महिन्याच्या सरकारकडून वर्षाचा अर्थसंकल्प

01-Feb-2019 : नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पाच राज्यांच्या निवडणुकीत सणकून पराभूत झालेल्या केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. या केंद्राचा कालावधी आचारसंहिता लागण्यापूर्वी महिनाभर उरला असला तरी संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करुन स्वत:ची पाठ केंद्र सरकारने थोपटून घेतली. पाच एकराखालील शेतकर्‍यांना प्रतिमहा ५०० रुपये मदत देण्याची घोषणा व गुंतवणुकीसह साडेसहा लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न करण्याची घोषणा करत मध्यमवर्ग व शेतकर्‍यांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारने केला. या शिवाय असंघटीत कर्मचार्‍यांना बोनस, पेन्शन तसेच सैनिकांची दुप्पट पेन्शन आदी महत्वाचे निर्णय अर्थसंकल्पात हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केले.

साडे चार वर्षांच्या सत्तेविरुद्ध जनसामान्यांमध्ये असलेली सुप्त नाराजी... एकजूट होत असलेले विरोधक आणि कर सवलतींसाठी असलेला दबाव, या सगळ्यांवर मोदी सरकारनं आज दिलाशाची जालीम ’मात्रा’ दिली . सवलतींचा पाऊस पाडत सुसाट सुटलेली मोदी सरकारची निवडणूकपूर्व अर्थसंकल्पीय ’बुलेट’ गावकरी, शेतकरी, महिला, नोकरदार या सार्‍यांना घेऊनच थांबली. छोट्या शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार, असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन, बोनस अशा घोषणा करणार्‍या सरकारनं पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून मास्टरस्ट्रोक मारला. तब्बल तीन कोटी नोकरदारांना दिलासा देणार्‍या या घोषणेनं संपूर्ण वातावरणच बदलून टाकले आहे. मध्यमवर्गियांकडून या अर्थसंकल्पाचं स्वागत होत असून विरोधकांनी नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर टीका सुरू केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. गोयल यांनी सुमारे तासभर भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मोदी सरकारनं गेल्या साडे चार वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी आर्थिक तरतुदी व सवलतींबाबत विविध घोषणा केल्या.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने शेतकर्‍यांना मोठी भेट दिली असून अल्प भूधारक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातील, १२ कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

असंघटीत क्षेत्रातील २१ हजार पगार असलेल्या कामगारांना ७ हजार बोनसची घोषणा केली आहे. तसेच ग्रॅच्युइटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रूपये करण्यात आले. याचा १० कोटी असंघटीत कामगारांना फायदा होणार आहे. कामगारांना प्रति महिना १०० रूपये भरावे लागणार आहेत. ६० वर्षांनंतर तीन हजार पेन्शन दिली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली.

‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे गरिबांचे तीन हजार कोटी रूपये वाचले.‘आयुष्यमान भारत’ गोरगरिबांना उपलब्ध करून दिली. त्या द्वारे ५० कोटी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे .

मोदी सरकार गायींसाठी कामधेनू योजना सुरू करणार आहे. राष्ट्रीय गोकूळ आयोगाची स्थापनी केली जाईल आणि कामधेनू योजनेवर ७५० कोटी रूपये खर्च केले जातील.

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पाच लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावरील कर पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं सरसकट सर्वांनाच पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफी मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, तज्ज्ञांनी याबाबत वेगळं मत मांडलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करमाफीचा लाभ करपात्र उत्पन्न ५ लाख किंवा पाच लाखांपेक्षा कमी असलेल्यांनाच मिळणार आहे. एखाद्या करदात्याचे उत्पन्न पाच लाखांच्या वर गेल्यास त्याला हा लाभ मिळणार नाही. अशा करदात्यांना त्यांच्या अडीच ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पूर्वीप्रमाणेच ५ टक्के कर भरावा लागणार आहे, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. नव्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार, या करदात्यांना केवळ स्टँडर्ड डिडक्शनच्या वाढीव मर्यादेचा लाभ मिळू शकणार आहे. दरम्यान काहींच्या मते पाच लाखांचे उत्पन्न करमुक्त त्यानंतर दीड लाखांची गुंतवणूक असे साडेसहा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता शक्य आहे.

शेअर बाजार उसळला : ४०० अंशांनी वधारला

केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारने मध्यम वर्गासाठी मोठा दिलासा दिल्याने याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारातही उमटले. पियूष गोयल यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात आनंदाची लाट पसरली . मुंबई शेअर बाजारात निर्देशांकाने काही मिनिटांत ४०० अंशांहून अधिक उसळी घेतली, तर निफ्टीही दीडशे अंशांच्या जवळपास वधारला होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी उघडताच ८२.४१ अंशांनी वधारला होता. पण अर्थसंकल्प सादर होताच दुपारी एक वाजेपर्यंत हा निर्देशांक ५०० अंशांपर्यंत उसळला होता. यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत निर्देशांक काहीसा खाली आला. त्यावेळी निर्देशांकात ४२७.९८ अंशाची वाढ दिसून आली. यावेळी निर्देशांक ३६,६८४.६७ अंशांवर होता. तर निफ्टीचा निर्देशांक १०,९५९.८५ वर पोहोचला. निफ्टीत १२८.९० अंशांनी वाढ झाली होती. अर्थसंकल्पामुळे निर्देशांकातील २६ कंपन्यांचे शेअर्स उसळले होते, तर ६ कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter