Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यात २३ लाख ५० हजार मतदार

01-Feb-2019 : सांगली / प्रतिनिधी

यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. या यादीनुसार जिल्ह्यात २३ लाख ५० हजार ३५९ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख १६ हजार ५२८ नवीन मतदारांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. मिरज विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख २२ हजार १७२ तर सर्वात कमी जत विधानसभा मतदारसंघात २ लाख ६७ हजार ७८५ मतदार आहेत. सांगली लोकसभेसाठी १७ लाख ९२ हजार १३१ मतदार नोंदविण्यात आले आहेत, तर सांगली जिल्ह्यातील ५ लाख ५८ हजार मतदार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान करतील.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. एक जानेवारी २०१९ रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांसाठी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत नव मतदारांसह स्थलातर आणि अन्य प्रक्रिया निवडणूक विभागाकडून राबविण्यात आली. नव्याने जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात २३ लाख ५० हजार ३५९ हजार मतदार असून १२ लाख १० हजार ९४० पुरुष तर ११ लाख ३९ हजार ३५६ स्त्री मतदार आहेत. त्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात तीन लाख २२ हजार १७२, सांगली विधानसभा मतदारसंघात ३ लाख १८ हजार २९०, इस्लामपूर मतदारसंघात २ लाख ६८ हजार ८७, शिराळा मतदारसंघात २ लाख ९० हजार १४१, पलूस - कडेगाव मतदारसंघात २ लाख ७४ हजार ६३८, खानापूर मतदारसंघात ३ लाख १९ हजार १८१, तासगाव - कवठेमंकाळ मतदारसंघात २ लाख ९० हजार ६५, तर जत विधानसभा मतदारसंघात २ लाख ६७ हजार ७८५ एवढी मतदार संख्या निश्‍चित झाली आहे.

जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील नवीन मतदारांची नोंदणी कमी होती. मतदार वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने मोहीम राबविली. या मोहिमेला नवमतदारांनी चांगलीच साथ दिल्याने एक लाख १६ हजार ५२८ मतदारांची नाव नोंदणी झाली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात नवीन मतदारांची १७ हजार ९०७ नोंदणी झाली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter