Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
थकित एफआरपीसाठी पाच कारखान्यांच्या जप्तीचे आदेश

01-Feb-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये गाळप झालेल्या उसाला एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने पाच कारखान्यांवर महसुल वसुली अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने सबंधित तहसिल-दारांना शुक्रवारी दिले. केन ऍग्रो (रायगाव), महांकाली (कवठेमहांकाळ), विश्‍वासराव नाईक (शिराळा), दत्त इंडिया (सांगली) आणि निनाईदेवी-दालमिया शुगर (कोकरुड) या पाच कारखान्यांचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी २२० कोटी ६६ लाख ६४ हजार रुपये थकविले आहेत. विश्‍वासराव नाईक, ७८.०० कोटी, केन ऍग्रो, ३३.५३ कोटी, निनाईदेवी-दालमिया, ३१.२३ कोटी, महांकाली, १५.८६ कोटी आणि दत्त इंडियाची ६२.०५ कोटी रुपयांची बिले थकित आहेत. एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याने ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम ३ (८) नुसार सदर ऊसदराची थकीत रक्कम महसुलाची थकबाकी समजून कारखान्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई (आरआरसी) करित असल्याची नोटीस साखर आयुक्तांनी दिली आहे. परंतू कारखानदार कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांची देणी देण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २३०० रुपयांप्रमाणे बहुतांशी कारखान्यांनी बीले जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची पुढील कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते.

जिल्हाधिकार्‍यांनी कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची विक्री करुन शेतकर्‍यांची ऊसबिले द्यावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. साखर आयुक्त गायकवाड यांनी दिलेल्या या आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला हे आदेश मिळाले असून, ज्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांकडून जप्तीची कारवाई होईल. सांगली जिल्ह्यातील विश्‍वासराव नाईक (शिराळा), केन ऍग्रो (रायगाव), निनाईदेवी-दालमिया (कोकरूड), श्री महांकाली (कवठेमहांकाळ), दत्त इंडिया (सांगली) या कारखान्यांवर जप्ती आदेश दिले. महसूल विभागाचे तहसिलदार योगेश खरमाटे यांनी कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter