Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सहाय्यक निबंधकाकडून खंडणी स्विकारताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षासह दोघांना अटक

01-Feb-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

सहाय्यक निबंधक अधिकार्‍याविरोधात वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारी मागे घेतो असे म्हणत १० लाखांची खंडणी स्विकारताना संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (रा.कासेगाव, ता.वाळवा) याला रंगेहात पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार कृष्णा विश्‍वनाथ जंगम (रा.वाळवा) याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. या दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , जानेवारी २०१७ मध्ये हुतात्मा कारखान्याची निवडणूक होती. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुषार ठोंबरे व सहा.निवडणूक अधिकारी म्हणून अमोल डफळे यांची नेमणूक होती. कृष्णा जंगम याने १० जानेवारी २०१७ रोजी उमेदवारी अर्जांचे प्रसिध्दी नोटीस बोर्डावर का केली नाही. आपण आपल्या पदाचा गैरवापर करता असा अर्ज अमोल डफळे यांच्याकडे केला होता. त्यानंतर कृष्णा जंगम याने २३ जानेवारी २०१७ रोजी राज्य निवडणूक प्राधिकार (सहकार) यांनाही पत्रव्यवहार केला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी केली असता जंगम यांच्या अर्जात काही तथ्य नसल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले . २७ नोव्हेंबर २०१८ रोजी संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर याने संभाजी ब्रिगेडच्या लेटर पॅडवर निवडणूक आयुक्त चौधरी यांना पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये तुम्ही कारवाई केली नाही , म्हणून २६ डिसेंबर रोजी तुमचा बेशरम अधिकारी म्हणून सत्कार करण्यात येणार आहे असा उल्लेख केला होता. त्या पत्रालाही निवडणूक प्राधिकरणाने काहीही तथ्य नसल्याचे कळविले होते. दरम्यान कासेगाव येथे सुयोग औंधकर व अमोल डफळे यांची भेट झाली. त्यावेळी डफळे यांनी औंधकरला निवडणूक कामात मी प्रामाणिक कर्तव्य केले आहे. आमचा काही संबंध नाही असे सांगितले. त्यावेळी औंधकरने कृष्णा जंगमची तक्रार मागे घेतो परंतू प्रकरण मिटविण्यासाठी पैसे लागतात असे म्हणत पैशाची मागणी केली. त्यानंतर १९ जानेवारी २०१९ रोजी पुन्हा औंधकरने बेशरम अधिकारी म्हणून तुमचा सत्कार ७ फेब्रुवारीला करणार असल्याचे सांगितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter