Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विटा पालिका स्वच्छतेमध्ये प.भारतात अव्वल
News Image

07-Mar-2019 : विटा / प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या अभियानात शहरातील सर्व विटेकर नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे विटा नगरपालिकेने देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर असणार्‍या पश्‍चिम भारतातील पाच राज्यांमध्ये २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणार्‍या नगरपालिका गटात देशात प्रथम क्रमांक तर सर्वसाधारण गटात देशात चौथा क्रमांक मिळविला. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील या दुहेरी यशामुळे सुवर्णनगरी विट्याचा देशभरात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावलौकीक झाला आहे. या दुहेरी यशामुळे विटा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे. हा सन्मान सामान्य विटेकरांचा असल्याची भावना नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील व वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत संपूर्ण देशातून ४,२३७ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील विटा शहर एक होते. ६ मार्च रोजी दिल्ली येथील विज्ञानभवन येथे झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात विटा नगरपालिकेने देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर असणार्‍या पश्‍चिम भारतातील पाच राज्यांमध्ये २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणार्‍या नगरपालिका गटात देशात प्रथम तर सर्वसाधारण गटात देशात चौथा क्रमांक मिळविल्याबद्दल केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते आणि नगरविकास सेक्रेटरी दुर्गा शंकर मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या विटा पालिकेला पारितोषिक व पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्डऍम्बेसिडर माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, आरोग्य सभापती ऍड. विजय जाधव यांनी हा सन्मान स्विकारला.

गतवर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ स्पर्धेत विटा पालिकेला देशात २५ वा तर राज्यात १२ वा क्रमांक मिळाला होता. या यशावर समाधान न मानता माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, स्वच्छता अभियानाचे ब‘ॅण्डऍम्बेसिडर माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, आरोग्य सभापती ऍड. विजय जाधव यांच्यासह सर्व सजग नगसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत विटा पालिकेला देशातील टॉप फाईव्ह शहरात आणण्याचा निर्धार करत यशस्वीपणे अभियान राबविले होते. स्टार रँकिंग प्रणालीत सातत्य टिकवून टॉपचे स्टार रँकिंग मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते. सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्याबरोबरच शहरातील सर्व नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, विविध मंडळे, संघटनांनी सक्रिय सहभाग घेत शहरात जोरदार स्वच्छता मोहिम राबविली होती. स्वच्छ विट्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले होते. गतवर्षीच्या २०१८ च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या निकालातून काही तांत्रिक उणीवा लक्षात आल्या होत्या. त्या उणीवा लक्षात घेऊन सहा महिन्यांत त्या तांत्रिक बाबींवर लक्ष देवून अत्यंत नियोजनबद्धरित्या शहरात स्वच्छता अभियान राबविले. केंद्र सरकार व राज्य सरकारने आता प्रत्येक शहराच्या स्वच्छतेसाठी रेटिंगसाठी स्टार देण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने स्टार रँकिंग प्रणालीत फाईव्ह स्टार रँकींग मिळवून देशातील टॉप फाईव्ह स्वच्छ शहर करण्याचा निर्धार करत यशस्वीरित्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले होते. विटा पालिका प्रशासनाबरोबर सर्व विटेकर नागरिकही २०१९ च्या स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी उतरले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter