Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिलेटीन कांड्यांची बेकायदा वाहतूक एकास अटक, एकजण फरारी

07-Mar-2019 : जयसिंगपूर / प्रतिनिधी

चिपरी (ता. शिरोळ) येथे ज्यूपिटर मोटरसायकलीवरुन जिलेटीनच्या ३६ कांड्या व इलेक्ट्रीक डिटोनेटर्सच्या ८० कांड्यांची बेकायदेशीर वाहतूक करत असताना जयसिंगपूर पोलिसांनी सापळा रचून बबन कोंडीबा पोटघन (वय ४०, रा. पाण्याची टाकीजवळ, चिपरी) याला पकडले. संशयीत पोटघनच्या चिपरी येथील घरामध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटीनचा साठा पोलिसांना मिळून आला. या मोटरसायकलीवरील अन्य एकजण दिपक वडर (रा. पेठवडगांव) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , जयसिंगपूर पोलिसांना चिपरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटीन कांड्यांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किरण दिडवाघ यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी दुपारी दिडच्या दरम्यान चिपरी गावात जाणार्‍या रस्त्यावर सापळा रचला व ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी करत असताना सदरचे आरोपी जिपीटर गाडीवरून (क्र. एम एच ०९ टी एस २४२) येत असल्याचे दिसले. पोलीस तपासणी करीत आहेत, हे लक्षात आल्यानंतर गाडी सोडून संशयीत पोटघन व वडर पळू लागले. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करुन बबन पोटघन याला पकडले तर दिपक वडर हा फरारी झाला. या कारवाईत पोलिसांना चिपरी येथील संशयीत पोटघनच्या घरामध्ये २०० जिलेटीन कांड्या तसेच वाहतुक करीत असताना इलेक्ट्रीक डेटोनेटर्सच्या ८० कांड्या व जिलेटीनच्या ३६ कांड्या मिळून आल्या. या कारवाईमध्ये बजरंग माने, पोलीस नाईक साजिद कुरणे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter