Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
संजयकाका-सुधीरदादा शितयुद्ध नव्या वळणावर

07-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीपासून खा. संजयकाका पाटील आणि आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्यात सुरू असलेले शितयुद्ध सिव्हील हॉस्पिटल उद्घाटनावरुन नव्या वळणावर पोहोचले आहे . आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नांमुळे बांधकामाचा विषय मार्गी लागला, मात्र खा. संजयकाका पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिव्हील हॉस्पिटलच्या ओपीडी बांधकामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम तासगावात घेतल्याने वाद अधिकच चिघळला आहे. आमदार सुधिर गाडगीळ यांनी अधिष्ठाता पल्लवी सापळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असता खासदारांनी अधिष्ठात्यांची पाठराखण केली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले.

सांगलीतील वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या मनमानी कारभाराचा फटका आ. सुधीर गाडगीळ यांना बसला आहे. शासकीय रुग्णालय येथे बाह्य रुग्ण विभागाचे ओपीडी बिल्डींगचे विस्तारीकरण या बांधकामासाठी १३ कोटी ९३ लाख खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली होती. तत्कालीन सरकारकडून त्या निधीचा वापर करण्यात आला नाही. २०१४-१५ मधील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोनगावकर यांनी वैद्यकीय मंत्री विनोद तावडे यांना हा निधी खर्च होत नसून शासनास परत पाठवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी आ. सुधीर गाडगीळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून सदर निधी शासकीय रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाच्या ओपीडी बिल्डींगसाठीच खर्च करण्यात यावा, असे आदेश दिले. त्यानंतर मंत्री तावडे यांच्या हस्ते त्या इमारतीचे भूमिपूजन केले , परंतु अधिष्ठाता सापळे यांनी जिल्ह्यातील आमदारांना कोणतीही पूर्व कल्पना न देता ओपीडी बिल्डींगच्या कोनशिलेचे उद्घाटन केले.

सिव्हील हॉस्पिटलच्या ओपीडी बिल्डींगचे उद्घाटन तासगाव येथे घेवून आ. गाडगीळ यांचा अपमान केल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रकरणाची चौकशी करून अधिष्ठाता सापळे यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी आ. गाडगीळ यांनी शासनाकडे केली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter