Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जीएसटीवरुन हळद सौदे बंद

07-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जीएसटीच्या वादावरुन बुधवारी हळदीचे सौदे ठप्प झाले आहेत. याबाबत जीएसटी अधिकारी. बाजार समिती, व्यापारी, आडते यांच्यात वारंवार बैठका होत आहेत. मात्र त्यातून ठोस निर्णय होत नसल्याने प्रश्‍न प्रलंबित राहिला. केंद्रिय जीएसटी अधिकार्‍यांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती , मात्र तोडग्याबाबत मतभिन्नता आहे.

मागील आठवड्यात हळदीच्या बीलपट्टीवर जीएसटी कपात न करता पट्टी देण्याबाबतचा निर्णय झाला आहे, मात्र जीएसटीचा वाद अद्याप संपलेला नाही. जीएसटी कपात न करता बीले दिल्यास नोटीसा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार्‍यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी हळद व्यापार्‍यांनी सौदे न काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजापुरी हळदीचे सौदे निघाले नाहीत. सभापती दिनकर पाटील, सचिव पी. एस. पाटील यांनी सौदे सुरु करण्याची विनंती केली, मात्र व्यापार्‍यांनी जीएसटीसह बीले देण्यात येतील, असे सांगितले. मात्र आडत्यांनी नकार दिला, त्यामुळे सौदे ठप्प राहिले.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू राज्यातील प्रमुख हळद व सोयाबीन बाजारपेठांमध्ये आडत्यांकडून खरेदीदारांकडे बिल दिले असता, जीएसटी कपात केली जात नाही. याच धर्तीवर सांगली मार्केट यार्डातही बिले व पट्ट्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कायद्यांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमालाचा व्यवहार होत असेल त्या व्यवहारावर जीएसटीचा आकार नील या लिस्टमध्ये होतो. इतर बाजारपेठेप्रमाणेच बिल पट्ट्या नमुने करणे बाजारपेठेच्या हितासाठी आवश्यक असून, त्याच पध्दतीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला. परंतू जीएसटी कपात न करता बीले दिल्यास नोटीसा काढल्या जाण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये जीएसटीचे राज्य उपायुक्त सुनिल कानुगडे, केंद्रिय जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश नानद आणि सांगलीचे केंद्रिय जीएसटी अधिकारी राजेंद्र मेढेकर, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter