Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शिराळ्यातील अंत्रीखूर्द येथे बिबट्याचे दर्शन

07-Mar-2019 : शिराळा / प्रतिनिधी

तालुक्यातील अंत्री खुर्द येथील चौगुले वस्तीजवळील शेताच्या बांधावर असणार्‍या निलगिरीच्या झाडावर गुरूवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या दिसल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात वारंवार अनेक गावांमध्ये बिबट्या दिसत आहे. गुरूवारी सकाळी येथील शेतकरी आपल्या रोजच्या कामाकरीता शेतात गेले असता त्यांना येथील निलगिरीच्या झाडावर बिबट्या असल्याचे आढळून आले. त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला , मात्र तो अयशस्वी झाला.

बुधवारी रात्री संजय चौगुले यांच्या शेतातील शेडमधील दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या, गावातील लोकांनी वन विभागाशी संपर्क केला आहे. वन विभागाची पथके बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अत्रीखुर्द परिसरात तैनात केली असून बिबट्याने डोंगरातील झाडीत धूम ठोकली आहे, शेतकर्‍यांनी आपली कामे जागेवरच थांबविली आहेत. या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले झाले असून काही शेतकर्‍यांनी आपली जनावरे शेतातून गावातील गोठ्यात आणली आहेत.

यापूर्वी ठीकठिकाणी बिबट्यांनी जनावरे व पाळीव प्राण्यांना आपले भक्ष्य बनविले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (चांदोली अभयारण्य) परिसरातील गावात या अगोदर बिबट्या दिसल्याचे किंवा त्यांनी प्राण्यांवर हल्ला केल्याचे आढळून येत होते, मात्र अलीकडच्या काही दिवसांत या बिबट्यांचा वावर मानवी वस्तीत जास्त असल्याचे जाणवते. वन विभाग व व्याघ्र प्रकल्पातील संबधित विभागांनी बिबट्यांचा मानवी वस्तीतील वाढलेला वावर याबाबत गांभिर्याने पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter