Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘त्या’ १५ महिन्यांतील दूध फरक बिलाचा हिशेेब द्या

07-Mar-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

दूध दरासंबंधात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका रद्द झाल्याने १७ जून २०१७ ते २७ सप्टेंबर २०१८ या १५ महिने १० दिवसांतील दूधाच्या फरक बिलाचा हिशेेब दूध उत्पादक शेतकर्‍यांना द्यावा लागणार आहे. या संदर्भात १५ मार्च रोजी मुंबई येथे दूग्ध आयुक्त नरेंद्र पायल यांच्यासोबत बैठक होणार आहे. तरी राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी हक्काचे फरक बिल घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. खा.राजू शेट्टी यांचा साखर कारखानदार व दूध संघांना हाताशी धरून शेतकर्‍यांच्या कष्टाचे पैसे बुडविण्याचा उद्योग फार काळ चालणार नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

रघुनाथदादा पाटील पुढे म्हणाले, राज्यातील १ जूनचा अभूतपुर्व संप मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही लोकांना सोबत घेवून मागे घेतल्याचे जाहीर केले. तरीही ५ जून रोजी मोठ्या प्रमाणात राज्यात बंद झाला. त्यानंतर राज्य सरकारने नमते घेतले. ११ जून रोजी अटी व शर्ती घालून कर्जमाफी दिली. त्याचा शेतकर्‍याला फायदा झाला नाही. गाईच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याचा अध्यादेश १७ जून २०१७ ला काढला. दूध उत्पादकांना इतका दर देणे परवडत नसल्याचे सांगत दूध संघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी सरकारने बाजू मांडणे गरजेचे होते , परंतू दूध संघांना सामील असणार्‍या सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने २७ रुपयांचा अध्यादेश काढला असताना दूध संघांनी खा.राजू शेट्टींना पुढे करुन ऐन पावसाळ्यात आंदोलन सुरु केले. खा. शेट्टींनी २७ किंवा त्यापेक्षा जादा दर मागण्याऐवजी २५ रुपये दर मागितला. शेट्टींच्या आंदोलनात दूध उत्पादक संघही सामील झाले. या आंदोलनात शेतकर्‍यांचे दूध थांबवून रस्त्यावर ओतल्याने नुकसान केले , तर आंदोलन काळात दुध संघातील पावडरीचे दूध करुन शहराकडे विकल्याने दूध संघांना प्रचंड नफा झाला. अखेर सरकारच्या मध्यस्थीने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनीच रद्द केल्याने २७ रुपयांचा स्थगिती आदेश संपला. त्यामुळे १७ जून २०१७ ते २७ सप्टेंबर २०१८ या काळातील दूधाच्या फरक बिलाचा हिशेब देण्याची मागणी दूग्ध आयुक्त नरेंद्र पायल यांच्याकडे केली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter