Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कुपवाड रोडवर आचार्‍याचा गळा चिरून खून

08-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

कामावरून सायकलने घरी परत जाणारे सुरेश सखाराम पाष्टे (वय ५२, रा. संजयनगर) यांचा येथील लव्हली सर्कल ते कुपवाड रस्त्यावर गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. खुनानंतर हल्लेखोर पसार झाले . समोरून आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या पोटात व पाठीवरही वार केल्याने ते जागीच गतप्राण झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश पाष्टे हे भारती विद्यापीठ संचलित वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या होस्टेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. संजयनगर परिसरात ते राहत असून त्यांना दोन मुले आहेत. शुक्रवारी रात्री काम संपवून परत येत असताना दहाच्या सुमारास लव्हली सर्कलमार्गे ते सायकलने घरी निघाले होते.

त्यावेळी लक्ष्मी मंदिराकडे जाणार्‍या रोडच्या वळणावर समोरून आलेल्या हल्लेखोरांनी काळोखात त्यांची सायकल अडवून पोटात तसेच पाठीवर चाकूने वार केले. या झटापटीत ते सायकलवरून खाली पडले. खाली पडताच त्यांचा गळा चाकूने निर्घृणपणे चिरून हल्लेखोरांनी तेथून पलायन केले. घटनास्थळी रस्त्याच्या मधोमध पाष्टे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात उताणा पडला होता.

घटनास्थळी सायकल, मोबाईल, पेन, मनगटी घड्याळ, चाकूचे पाते, मूठ, रूमाल असे साहित्य पडले होते. मिरजेचे पोलीस उपअधीक्षक संदीपसिंग गिल, संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सुर्वे, गुंडा विरोधी पथकाचे संतोष डोके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली.

खुनाचे वृत्त समजताच मोठा जनसमुदाय घटनास्थळी जमला होता. आचारी सुरेश पाष्टे यांच्या दोन्ही मुलांनी वडिलांचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. मृतदेह सिव्हिल रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. हल्लेखोरांच्या शोधासाठी रात्री उशिरा पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter