Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कृषी राज्यमंत्री व खासदारांची कामे निधीअभावी थांबणार

08-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) कामांना निधीची अडचण निर्माण झाली आहे. आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह काही आमदारांनी सुचविलेली कामे निधीअभावी थांबणार असल्याचे चित्र आहे. कामांना दोन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली असली तरी ३ कोटी रुपयांच्या कामांसाठी निधीची कमतरता असल्याने ही कामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार आहेत.

जिल्हा परिषदेने नियोजन समितीकडे रस्ते तसेच अन्य बांधकामांना निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविले होते. गेल्या तीन महिन्यांपासून या कामांना मंजुरी मिळाली नसल्याने प्रस्ताव नियोजन समितीकडे धुळखात पडून होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, डीपीसीच्या कामांना मंजुरी मिळाली नसल्याने कामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेवून निधी देण्याची मागणी केली होती. त्यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला आहे , मात्र तो अद्यापही कमी पडत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter