Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून पुन्हा प्रतीक पाटीलच उमेदवार?

08-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील बारा उमेदवारांची नावे जवळ जवळ निश्‍चित केली आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून पुन्हा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. राज्यात दोन्ही कॉंग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरलेला आहे. त्यानुसार कॉंग्रेसने शुक्रवारी पहिल्या टप्प्यात आपले १२ उमेदवार जाहीर केले . त्यामध्ये सांगली लोकसभा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, नांदेड लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या पत्नी आ.अमिता चव्हाण, सोलापूर मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह १२ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

सांगली लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून आ.विश्‍वजीत कदम, विशाल पाटील, प्रतिक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची चर्चा होती. जिल्हा बैठकीत त्यांची नावे प्रदेश समितीकडे पाठविण्यात आली होती , मात्र आ.विश्‍वजीत कदम व विशाल पाटील यांनी लोकसभा लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रतिक पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची चर्चा दिल्ली दरबारी सुरू होती. शुक्रवारी प्रतिक पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. स्व. प्रकाशबापू पाटील यांच्या निधनानंतर २००६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतिक पाटील विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळविला होता. त्यावेळच्या मंत्रिमंडळात त्यांना केंद्रीय कोळसा राज्यमंत्रीपद मिळाले होते. पाच वर्षे ते मंत्रीपदावर होते , मात्र सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिक पाटील यांचा भाजपचे खा. संजयकाका पाटील यांनी सुमारे सव्वा दोन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर काही काळ प्रतिक पाटील विजनवासात होते , मात्र ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांनी मतदारसंघात संपर्क सुरू केला आहे. त्यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. गांधी घराण्याने पुन्हा दादा घराण्यावर विश्‍वास ठेवत प्रतिक पाटलांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter