Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वज्रवाडच्या नऊ वर्षाच्या बेपत्ता मुलीचा संशयास्पद मृत्यू

09-Mar-2019 : जत / प्रतिनिधी

वज्रवाड (ता. जत) येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अक्षता सिद्धया मठपती (वय ९) असे मृत मुलीचे नाव असून शनिवारी सकाळी नऊ वाजता पाण्याची मोटर चालू करण्यास गेलेल्या शेतकर्‍यांना विहिरीमध्ये अक्षता हिचा मृतदेह आढळून आला. गुरूवारपासून ती बेपत्ता असल्याची फिर्याद जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, मठपती कुटुंबांच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र याबाबत जत पोलिस ठाण्यात अशी कोणतीच नोंद झाली नव्हती. घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व अधिक चौकशीसाठी सांगलीच्या श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र , शोध घेण्यात श्‍वान पथकाला अपयश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षता मठपती ही वज्रवाड गावात जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या वर्गात शिकत होती. गुरूवारी दि.७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता शाळा सुटल्यानंतर ती घरी जात होती. वाटेत आई व लहान भाऊ जतला दवाखान्यास जात असताना तिची त्यांच्याशी भेट झाली. शाळा व अक्षताच्या घराचे अंतर हे अवघे अर्धा किलोमीटर इतके आहे.

घरी आजी एकटीच होती , मात्र, अक्षता दुपार झाली तरी घरी आली नाही, चौकशी करण्यात आली पण तिचा कोठेही थांगपत्ता लागला नाही. आई जतहून घरी परत आल्यावर आईने शाळेतील अक्षताच्या मैत्रिणी व शेजारच्यांकडे चौकशी केली. ती कोठेही मिळून न आल्याने घरच्यांनी जत पोलिस ठाण्यात अक्षता बेपत्ता असल्याची वर्दी दिली . शनिवारी सकाळी नऊ वाजता घराजवळ दोनशे ते तिनशे फुटावर असलेल्या बसगोंडाप्पा बनसोडे यांच्या विहिरीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे मठपती कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तात्काळ जत पोलिसात दिली. पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेची नोंद रात्री उशीरापर्यंत झाली नव्हती. अधिक तपास उपनिरीक्षक रणजित गुंडरे करत आहेत.

रात्रीपासून फिंगर प्रिंट, श्वान पथकाकडून चौकशी...

अक्षता मठपती ही शाळेतून येत असताना बेपत्ता झाली होती. याची फिर्याद जत पोलिसात दिल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून फिंगर प्रिंट व श्‍वान पथकाकडून घटनास्थळी कसून चौकशी करण्यात येत आहे. गावातील अनेक संशयित ठिकाणे व विहिरींमध्ये पोलिसांनी तपास केला. मात्र, शनिवारी सकाळी अक्षताचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter