Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जतच्या ६५ गावांसाठी नव्या योजनेला मंजुरी

09-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

म्हैसाळ सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील ६५ गावांसाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची नवी योजना प्रस्तावित केली असून या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली असल्याची माहिती खा.संजयकाका पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. म्हैसाळ योजनेत समाविष्ट नसलेली ४८ गावे व अल्प समाविष्ट असलेली १७ गावे अशा ६५ गावांसाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सिंचन योजनांचा लाभ मिळू शकणारी, पण योजनेत समाविष्ट नसलेली ४८ गावे आणि सुधारित प्रस्तावीत मान्यतेमध्ये समाविष्ट असलेली १७ गावे, अशी एकूण ६५ गावे म्हैसाळ योजनेच्या विस्तारित प्रकल्पात समाविष्ट केली आहेत. हा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्यांनी अहवालाची पाहणी करून त्यास तत्वत: मान्यता दिली. बंदिस्त जलवाहिन्यांमुळे जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची बचत झाली असल्याने तेवढ्याच बचतीच्या रकमेत ६५ गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार असल्याची बाब आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली. मुख्यमंत्र्यांनीही त्यास हिरवा कंदिल दर्शविला आहे.

कुरघोड्या कोण करतंय याची माहिती घेऊ...

माझ्या विरोधात भाजपमध्ये संशयास्पद वातावरण केले जात आहे. अशा कुरघोड्या करणार्‍यांच्या खोलात जावून माहिती घेऊ , असे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. मी आयुष्यात कोणाच्या मागे लागलो नाही , कोणी कोटी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची फिकीर केली नाही. मी विकासकामाचे ध्येय ठेवून काम केले, त्यावरच उभा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला , दरम्यान गेल्यावेळी अडीच लाखांचे मताधिक्य होते, यावेळी आपण तीन लाखांवर मताधिक्यांनी विजयी होऊ असा विश्‍वास खा.संजयकाकांनी व्यक्त केला.

संजय पाटील यांना पक्षात अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध आहे , नाराजी सुरू आहे. याबद्दल विचारता ते म्हणाले, तसे काही नाही. सर्वच आमदार, पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. त्यातून जरी कोणी कार्यकर्ते संशयास्पद वातावरण निर्माण करीत असेल तर त्याच्या खोलात आता जावेच लागेल. आमदार, पदाधिकार्‍यांकडून तुमच्या उमेदवारीबद्दल निश्‍चिती दिली जात नसल्याबद्दल विचारता पाटील म्हणाले, भाजपमध्ये उमेदवारीची प्रक्रिया आहे. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही त्यांची उमेदवारी निश्‍चित नसल्याचे स्पष्ट केले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter