Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
उमेदवारी जाहीर झाल्यावर येणार रंगत

11-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानाच्या तारखादेखील जाहीर झाल्या, मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात अद्याप भाजप व कॉंग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यानंतरच खरी रंगत येणार आहे. भाजप गड राखण्यासाठी तर कॉंग्रेस गड खेचून आणण्यासाठी लढणार आहे , मात्र या दोन्ही पक्षांना गटबाजीचे आव्हान असणार आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता , मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खा.संजयकाका पाटील यांनी कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा तब्बल सव्वा दोन लाख मतांनी पराभव करून इतिहास रचला . त्यानंतर गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात भाजपने चांगला जम बसविला आहे. जिल्हा परिषद, महापालिकेसह अनेक पंचायत समित्या व ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. यामध्ये भाजपकडे तीन, शिवसेनेकडे एक, राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडे प्रत्येकी एक-एक मतदारसंघ आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे पारडे जड आहे.

जिल्ह्यातील कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळलेला आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसने हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी पुन्हा फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी केंद्रीय व राज्य पातळीवर नेत्यांनीदेखील लक्ष घालण्यात सुरूवात केली आहे. निवडणुकीत मोदी लाट जरी ओसरली असली तरी भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. भाजपकडून पुन्हा खा. संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीची दाट शक्यता आहे , मात्र भाजपमध्ये खा. संजयकाका पाटील यांच्या विरोधात काही आमदार व पदाधिकार्‍यांमध्ये उघड-उघड नाराजी आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अजितराव घोरपडे हे सध्या नाराज आहेत.

मिरज मतदारसंघात भाजप अंतर्गत गटबाजी उफाळली आहे. जत व खानापूर-आटपाडी मतदारसंघातही भाजपमध्ये उघडपणे गटबाजी दिसून येत आहे. काहींनी पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवार बदलावा, अशी मागणी देखील केली आहे. खा.संजयकाका पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज देशमुख व दिपक शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे , मात्र पक्षाकडून सध्या खा. संजयकाका पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. भाजप पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक चार दिवसांत होणार आहे. या बैठकीत उमेदवारीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे भाजपला २०१४ च्या तुलनेत यंदा अधिक संघर्ष करावा लागणार आहे. भाजपअंतर्गत गटबाजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्याला यश मिळाले तर, भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

भाजपच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. आघाडीमध्ये ही जागा कॉंग्रेसची आहे. त्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची चर्चा दिल्ली दरबारी सुरू आहे. आ.विश्‍वजीत कदम यांनी यापूर्वी लोकसभा लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विशाल पाटील अथवा पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसमध्ये गटबाजी जोरात आहे. दादा गटात उमेदवारी दिल्यास कदम गट मदत करणार का? अशी देखील चर्चा सुरू आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter