Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
नेत्यांचे फोटो हटविण्यावरूनही ‘राजकीय खेळी’

11-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मनपा प्रशासनाने पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील राजकीय नेत्यांचे फोटो काढण्यावरून वाद निर्माण झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यालयातील नेत्यांचे फोटो हटविण्यात आले मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो न काढल्याने मैनुद्दीन बागवान यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. यानंतर दुपारी भाजप पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील फोटो काढण्यात आले. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील ८४ डिजिटल फलक मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. तर पदाधिकार्‍यांची वाहने देखील ताब्यात घेतली आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी आचारसंहिता जाहीर झाली े. सोमवारी सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे महापालिकेची सर्व कार्यालये उघडली. आचारसंहितेचे कारण देत प्रशासनाने फलक, पदाधिकार्‍यांची नेमप्लेट, नेत्यांची छायाचित्रे हटविण्यास सुरूवात केली. सकाळच्या टप्प्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयातील माजी मंत्री मदन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, राजारामबापू पाटील यांची छायाचित्रे काढण्यात आली. उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांच्या कार्यालयातील भाजप नेत्यांची छायाचित्रेही हटविली , पण महापौर व स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयातील भाजप नेत्यांची छायाचित्रे कायम होती. ही छायाचित्रे काढली गेली नव्हती.

दुपारी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान त्यांच्या कार्यालयात आले असता नेत्यांची छायाचित्रे काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी भाजप पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील छायाचित्रे मात्र कायम होती. त्यांनी तातडीने प्रशासकीय अधिकार्‍यांना बोलावून घेऊन जाब विचारला. निवडणुकीची आचारसंहिता कॉंग्रेस, राष्ट्रवादी व उपमहापौरांनाच लागू आहे का? इतर पदाधिकार्‍यांना ती लागू नाही का? अशी प्रश्‍नांची सरबत्ती केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter