Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
आचारसंहितेत अडकली मनपाची सव्वाशे कोटींची कामे

11-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेला नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींच्या विकासकामांना आता ब्रेक लागला आहे. या शिवाय समाजकल्याण समिती, नगरसेवकांचा स्थानिक विकास निधी व जिल्हा नियोजन समितीमधील विकासकामे थांबणार आहेत. त्यामुळे सुमारे सव्वाशे कोटींची कामे आता लांबणीवर पडणार आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता. त्यानुसार मनपाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये रस्ते, गटारी, भाजी मंडई, नाट्यगृहाचे नूतनीकरण यांसह २७८ कामांचा समावेश आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही कामे सुरू व्हावीत, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कमी कालावधी म्हणजे सात दिवस मुदतीची निविदाही काढण्यात आली. या निविदा प्रसिद्ध करून चार दिवस झाले आहेत. पण आचारसंहिता लागू झाल्याने निविदेची पुढील प्रक्रिया थांबणार आहे. केवळ निविदा मागविल्या जाणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter