Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘शेतकरी सन्मान’चे काम थांबविले : जिल्ह्यातील दीड लाख शेतकर्‍यांना आचारसंहितेचा फटका

14-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर २ हजार रुपये जमा करण्यात येत असल्याचा गाजावाजा करण्यात आला असला तरी जिल्ह्यातील दीड लाख शेतकर्‍यांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. निवडणुकीमुळे शेतकर्‍यांची माहिती अपलोड करण्याचे काम थांबविण्यात आले. या शेतकर्‍यांना निवडणुकीनंतरच शेतकरी सन्मानची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अर्जामध्ये ७७ हजार शेतकर्‍यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यापैकी ३७ हजार २८८ त्रुटींची दुरुस्ती करुन पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री किसान शेतकरी सन्मान योजनेचा जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. सन २०१०-११ मधील सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात चार लाख ४३ हजार २६० शेतकर्‍यांची नोंद आहे. योजनेतून दोन हेक्टर जमीन असणार्‍या शेतकर्‍याला मिळणारी मदत थेट त्याच्या खात्यात तीन टप्प्यांत जमा केली जाणार आहे. योजना डिसेंबर २०१८ पासून सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना एनबीसीआय या कंपनीकडून थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

पहिल्या हप्त्याचे दोन हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू होती. या योजनेसाठी पात्र हेक्टरपर्यंत शेती असलेले सुमारे दोन लाख ३९ हजार ३३४ इतके शेतकरी आहेत. त्यापैकी दोन लाख ३२ हजार ३३४ इतक्या शेतकर्‍यांच्या याद्या ऑनलाईन अपलोड केल्या होत्या, त्यापैकी ७७ हजार शेतकर्‍यांचे प्रस्ताव विविध कारणाने अपात्र करण्यात आले होते. त्रुटी दुरूस्त करून पुन्हा प्रस्ताव अपलोड केल्यानंतर आणखी ३७ हजार २९९ शेतकरी या मदतीसाठी पात्र झाले , तर ३० हजार शेतकरी अद्याप अपात्रच आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठीची आचार संहिता लागू झाल्याने तसेच ही योजना वैयक्तीक लाभाची असल्याने नव्याने शेतकर्‍यांची यादी अप लोड करण्याचे काम शासनाने थांबविले आहे. यामुळे सुमारे दीड लाख शेतकर्‍यांचे प्रस्ताव अपलोड करण्याचे थांबविण्यात आले असून आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु राहणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना किमान दोन महिने या मदतीची वाट बघावी लागणार आहे.

जिल्हा बँकेचे खातेदार अद्यापही प्रतिक्षेत

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सर्वाधिक खातेदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांतील काही शेतकरी खातेदारांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील काही शेतकरी जिल्हा बँकेच्या शाखेत जावून विचारणा करीत होते , मात्र एकाही शेतकर्‍याच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम जमा झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाला कळविले आहे, परंतू अद्याप त्यांच्याकडून काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

दुष्काळी निधी जमा करण्याची कार्यवाही सुरु

शासनाने दुष्काळी भागातील शेतकयांना दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर झालेल्या गावातील शेतकर्‍यांना खरीप आणि रब्बीसाठी हेक्टरी सात तर फळबागासाठी हेक्टरी १९ हजार देण्याची घोषणा केली आहे. यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे सुमारे ११६ कोटी इतका निधी दिला आहे. हा निधी प्रशासनाने बँकाकडे दिला आहे. संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर निधी जमा करण्याचे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter