Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मिरजेत मटका अड्ड्यावर छापा पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

14-Mar-2019 : आठजणांस अटक

मिरज / प्रतिनिधी

शिराज दादापीर कोतवाल (रा.आदर्श कॉलनी, पंढरपूर रोड , मिरज ) हा त्याच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बेकायदा मोबाईलवरून बेकायदा मटका घेत असताना मिरजच्या उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने छापा टाकून आठजणांना अटक केली . रोख २ लाख ९४ हजार ४२० रूपये तसेच १३ मोबाईल, चार मोटरसायकली, जुगाराच्या चिठ्ठ्या असा एकूण ४ लाख ६२ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मिरज-पंढरपूर रोडवर शिराज कोतवाल हा मोबाईलवर बेकायदा मटका घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंह गिल यांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून शिराज कोतवाल यांच्या बंगल्याच्या दुसर्‍या मजल्यावर छापा टाकला. मोबाईल फोनवर लोकांचेकडून पैसे घेऊन कल्याण व मुंबई मटका तो घेत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी शिराज दादापीर कोतवाल तसेच एजंट सलीम मिरासाहेब शेख (रा. मंगळवारपेठ , मिरज), फिरोज मुलाणी (रा . शिरटी मशिदजवळ), अनिल रामसिंग परदेशी (रा. दर्गा कमान, मिरज), फिरोज ऊर्फ नानू गौस अत्तार (रा.सुभाषनगर रोड , अमननगर, मिरज). सदानंद महादेव खेडकर (रा. गाडीवाडी गल्ली , गुरुवारपेठ, मिरज), समीर हजरत मुतवल्ली (रा.दर्गा कमान, मिरज), गणेश मल्लाप्पा हेरवाडे (रा. मंगळवारपेठ , मिरज) यांना अटक केली . हे सर्वजण मोबाईल फोनवरुन आकडा घेवून त्याची प्रिंटरवर प्रिंट काढून कल्याण व मुंबई मटका जुगाराच्या आकड्यांवर लोकांकडून पैसे घेवून जुगाराचा खेळ खेळत होते.

जुगार खेळण्यासाठी दिलेली रोख रक्कम २ लाख ९४ हजार ४२० रूपये, वेगवेगळ्या कंपन्यांचेे १३ मोबाईल (अंदाजे किंमत ४७ हजार ५०० रूपये) , तसेच वेगवेगळ्या कंपनीच्या चार मोटरसायकली (अंदाजे किंमत १ लाख १५ हजार रूपये), तसेच जुगाराच्या चिठ्ठ्या व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ६२ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter