Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत तरूणाला आयशरने चिरडले

15-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

गजबजलेल्या स्टँड रोडवर ट्रकखाली सापडून पादचारी तरूण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मंगेश राजाराम बामणे (वय ३५, रा. रोहिदासनगर, हरिपूर रोड, सांगली) असे त्याचे नाव आहे. येथील बसस्थानक परिसरातून शिवाजी मंडईकडे जाणार्‍या रस्त्यावर हा अपघात झाला.

भंगार व्यावसायिक बामणे हा रोहिदासनगर येथे कुटुंबासोबत राहतो. गुरूवारी रात्री आठच्या सुमारास तो बसस्थानक परिसरातून शिवाजी मंडईकडे चालत निघाला होता. त्यावेळी भरधाव वेगाने मागून आलेल्या ट्रकने (क्र. एमएच १७ एस ४६७८) त्यास जोराची धडक दिली. त्यात पुढील चाकाखाली सापडून बामणे चिरडला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर जमाव गोळा झाला. जमावाला पाहताच ट्रक चालकाने पलायन केले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती. शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, परिसरातील दुकानांच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter