Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गोपीचंद पडळकर ३ एप्रिलला अर्ज दाखल करणार - संजयकाका पाटील म्हणजे गद्दार नेते

30-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

खासदार संजयकाका पाटील यांना भाजपमध्ये आणून मी खासदार केले आहे. मात्र त्यांनी पक्षाशी व माझ्याशी गद्दारी केली. ते आजही गद्दार आहेत , आणि उद्याही गद्दारच राहणार, असा आरोप धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत केला , तर विशाल पाटील हे भाजपचे डमी उमेदवार आहेत. दादांच्या नावावर आता मतांचा जोगवा मागण्याचे दिवस राहिलेलेे नाहीत, असा आरोप करत लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे सांगून ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागा मिळाल्यानंतर चार दिवसांपूर्वी कराड येथे मला बैठकीसाठी बोलविले होते. त्यावेळी आ.सतेज पाटील व आ.विश्‍वजीत कदम उपस्थित होते. या नेत्यांनी मला स्वाभिमानीकडून उमेदवारी फायनल झाल्याचे सांगितले , मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर भाजपचा दबाव होता. मराठा समाजाचे मला मतदान होणार नाही, असा अपप्रचार करून माझी उमेदवारी डावलली व विशाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे , मात्र ते कारखानदार आहेत. त्यांच्या वसंतदादा कारखान्याने आजही एफआरपीप्रमाणे बिले दिलेली नाहीत. दादांचे नाव सांगून मते मागण्याचे दिवस आता संपले आहेत. दादांच्या रक्ताचे विशाल पाटील जरी वारसदार असले तर मी दादांच्या विचारांचा वारसदार आहे. विशाल पाटील यांना दादांचे विचार माहिती असतील तर त्यांनी जाहीर करावेत? असे आवाहन पडळकर यांनी दिले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter