Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विशाल पाटील ‘स्वाभिमानी’कडूनच लढणार

30-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला गुंता अखेर शनिवारी सुटला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. वसंतदादांनी आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी काम केले. त्यामुळे मी स्वाभिमानी कॉंग्रेसचा पाईक म्हणून उमेदवारी स्वीकारली. या संदर्भात कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली असल्याचे विशाल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्ष सहभागी झाले आहेत. त्यामुळे आघाडीत शेतकरी संघटनेला दोन जागा दिल्या आहेत. राष्ट्रवादीने हातणकगंले तर कॉंग्रेसने सांगलीची जागा सोडली होती , मात्र सांगलीत उमेदवारीचा गुंता सुटत नव्हता. अखेर शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी यांनी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह कॉंग्रेस व स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.राजू शेट्टी म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर ५६ संघटनांनी महाआघाडीची स्थापना केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वसंतदादा पाटील घराण्याकडे सांगलीची जागा होती. मात्र यावेळी ही जागा ‘स्वाभिमानी’ ला देण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. कॉंग्रेस कार्यकर्ते देखील नाराज झाले होते. मित्र पक्षात अशी नाराजी व संघर्ष नको अशी माझी भूमिका होती. जातीयवादी भाजपला रोखण्याचे काम करायचे आहे. लोकशाही धोक्यात आणण्याचे काम करणार्‍या भाजपचा पराभव करण्याचे एकमेव ध्येय होते. त्यामुळे आघाडीत कुठेही कटुता निर्माण होणार नाही. याची काळजी घेत सांगलीची चर्चा झाली. समन्वयाने विशाल पाटील यांना स्वाभिमानीची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिाकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. आघाडीमध्ये सामील होतान किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर कधीही तडजोड होणार नाही. ऊसाचा प्रश्‍न निर्माण झाल्यास आपली भूमिका कायम असेल. निवडणुका वेगळ्या असतात व चळवळ वेगळी असते. भविष्यात शेती प्रश्‍नांवर आंदोलन जरी केले तरी विशाल पाटील आमच्या बाजुने असतील, असे मत खा.राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय स्वाभिमानी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व इतर प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन घेतला आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा पाटील यांनाच असल्याचे खा.शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी विशाल पाटील म्हणाले, स्वाभिमानी कॉंग्रेसचा पाईक म्हणून निवडणूक लढविणार आहे. अपक्ष लढायचे काय? याचा विचार करत होतो, मात्र पक्ष विरोधात भूमिका घेऊ नये, असे माझे मत झाले. मुंबई येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यांनीच स्वाभिमानीच्या उमेदवारीला मान्यता दिली. त्यामुळे या नेत्यांशी चर्चा करूनच उमेदवारीचा निर्णय घेतला असल्याचा खुलासा त्यांनी केला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter