Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मराठा आरक्षणाचा प्रश्‍न खा. राजू शेट्टींनी मांडला, मग संजयकाकांनी काय केले?

01-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

मराठा समाजाचे आरक्षणासह विविध प्रश्‍न प्रलंबित असताना मागील पाच वर्षांत सांगलीचे खा.संजयकाका पाटील यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करत हा प्रश्‍न खा.संभाजीराजे व खा.राजू शेट्टींनी संसदेत उपस्थित केला व ठराव मांडला. समाजाचे प्रश्‍न खासदारांनी मांडले नाहीत, असा खडा सवाल सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला.

येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने भूमिका मांडण्यासाठी बैठक घेण्यात आली. मराठा क्रांतीचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील, विलास देसाई, विक्रम सावर्डेकर, शाहीर पाटील, बापूसाहेब गिड्डे, बाळासाहेब पाटील, संकेत परब, ऋुतुराज पवार, सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सत्ताधारी भाजप आणि तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न भेडसावत असताना नेत्यांनी राजकारण करण्यात स्वार्थ मानला. सांगलीच्या खासदारांनी मराठा समाजासाठी मागील पाच वर्षांत काय केले? असा प्रश्‍न उपस्थित करुन नाराजी व्यक्त करण्यात आली. कोल्हापुरचे खा. संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खा. राजू शेट्टी यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा ठराव संसदेत मांडला , परंतू सांगलीच्या खासदारांनी एकदाही समाजाचा प्रश्‍न मांडला नाही. समाजाचे प्रश्‍न आजही कायम आहेत, मराठा समाजाची खंत संसदेत मांडणारा खासदार हवा आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter